गोंदिया : शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्याची मोहीम २१ ते २३ सप्टेंबरच्या दरम्यान ६ ते १४ वयोगटांतील शाळाबाह्य, स्थलांतरित बालकांची शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. शाळाबाह्य बालकांचा शोध घेताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, स्वत:ची आरोग्यविषयक काळजी घेऊन शाळाबाह्य बालकांना दाखल करण्याबाबत निर्देश शिक्षण विभागामार्फत देण्यात आले आहेत.
२१ ते २३ सप्टेंबर, २०२१ला शोध मोहीम राबविण्यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहे. या शोधमोहिमेत ६ ते १४ वर्षे वयोगटांतील ग्रामीण व शहरी भागातील कधीच शाळेत न गेलेली, मध्येच शाळा सोडलेली, शाळाबाह्य बालके, तसेच इयत्ता ८ वीतील सतत ३० दिवस गैरहजर बालकांची माहिती संकलित करण्यात येणार आहे. ही शोधमोहीम बालरक्षक, शिक्षक, विषय साधनव्यक्ती, समावेशीत विशेष तज्ज्ञ, विशेष शिक्षक यांच्यामार्फत तीन दिवस करायची आहे. एकही शाळाबाह्य बालक राहणार नाही, याकरिता तीन दिवसीय शोधमोहिमेचे नियोजन करण्यात आले. शाळाबाह्य मुलांच्या नोंदीच्या प्रपत्रामध्ये शाळाबाह्य बालकांची माहिती शोधकर्त्यांनी भरावी, शोधमोहीम बस स्थानक, विटभट्ट्या, शेतीची रोवणी करणारे मजूर, घरकुलाचे बांधकाम करणारे मजूर, तेंदुपत्ता संकलन करणारे, अस्थायी निवारा करणारी कुटुंबे, हायवे रस्त्यावरील बांधकाम, रेल्वे स्टेशनबाहेरील परिसर, भीक मागणारे व कचरा वेचणारे बालके, हॉटेलमध्ये काम करणारे बालमजूर, रेड लाइट एरिया या ठिकाणी करण्यात येणार आहे. कुडवा, अदासी, बाबाटोली, काचेवानी या ठिकाणी ही शाळाबाह्य बालके असण्याची शक्यता नाकारता येत नाही. २०२१-२२ या शैक्षणिक सत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून, गोंदिया जिल्हा हा शाळाबाह्य मुक्त बालक या दिशेने वाटचाल करेल, या उद्देशातून काम करावे, असे मुकाअ अनिल पाटील यांनी म्हटले आहे.