लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढला असून बाधितांचे आकडे दररोज दुप्पट होत आहे तर, ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव वेगाने वाढत आहे. मात्र ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अद्यापही पाहिजे त्याप्रमाणात अलर्ट नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, कोविड केअर सेंटरचा यांना आकस्मिक भेटी देऊन त्यांचा आढावा घेण्यास जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर आल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून आरोग्य यंत्रणेचा दुर्लक्षितपणा पुढे येत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा वेगाने संसर्ग वाढत आहे. अशात लसीकरणावर भर दिला जात आहे. याला अधिक गती मिळावी यासाठी तालुकास्तरावर काय उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा वाढता प्रकोप कमी करण्यासाठी तालुका पातळीवर आरोग्य यंत्रणेने नेमका काय ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. याचा आढावा घेण्यास जिल्हाधिकारी मीना यांनी सुरुवात केली आहे.
२५ प्रश्नातून घेणार आढावा जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना हे आठही तालुक्यातील आरोग्य, महसूल, पोलीस यंत्रणेचा आढावा घेणार आहेत. यासाठी त्यांनी २५ प्रश्न तयार केले असून, या माध्यमातून तालुक्यातील कोरोनाची स्थिती आणि लसीकरण याचा आढावा घेत आहेत. तसेच तालुक्यात रुग्ण वाढल्यास स्थानिक पातळीवर काय तयारी आहे, याचासुद्धा ते आढावा घेत आहेत. जिल्ह्यात पाच कोविड केअर सेंटर जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या विचारात घेता, पुन्हा सहा कोविड केअर सेंटर करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. यात अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, गोंदिया, आमगाव आणि गोरेगाव येथील केंद्राचा समावेश आहे. तसेच या केंद्रात सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहा विभागाच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारीसुद्धा निश्चित करून दिली आहे.