गोंदिया : शहरातील छोटा गोंदिया परिसरात मागील आठ दिवसांपासून मलेरिया आणि डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर दोन रुग्णांचा मृत्यूसुद्धा झाला. या परिसरात आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात डेंग्यूचे १० रुग्ण आढळल्याची माहिती आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याचे दिलासादायक चित्र असताना दुसरीकडे मात्र गोंदिया शहरातील छोटा गोंदिया परिसरात डेंग्यू आणि मलेरियाचा प्रकोप सातत्याने वाढत आहे. या परिसरात डासांचासुद्धा मोेठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढल्याने त्यातून नागरिकांना साथीच्या आजारांची लागण होत असल्याची ओरड सुरू आहे. या परिसरात डासनाशक फवारणी करण्याची मागणी नागरिकांनी अनेकदा नगर परिषदेकडे केली. पण, वेळेत फवारणी करण्यात आली नाही. मागील आठ दिवसांपासून डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांची ओरड वाढल्यानंतर मंगळवारपासून आरोग्य विभागाने या परिसरातील नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यास सुरुवात केली आहे. यात १० डेंग्यूचे रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. त्यामुळे संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी या परिसरात शिबिर लावून उपाययोजना करण्याची गरज आहे.
................
नागरिकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
शहरातील छोटा गोंदिया परिसरात डेंग्यू आणि मलेरियाचा वाढता प्रकोप लक्षात घेता या परिसरात डास नाशक फवारणी व आरोग्य विषयक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण यांच्याकडे केली. शिष्टमंडळात कशिश चंद्रिकापुरे, पिंकू मेश्राम, कपिल रंगारी, योगेश चव्हाण, राहुल गणवीर, निखिल वैद्य, सुरेश फुले, शैलेश घोडेस्वार यांचा समावेश होता.