राजीव फुंडे लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : महसूल विभागांतर्गत येणाऱ्या तालुक्यातील मानेकसा घाटावर मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन केले जात आहे. रेतीच्या उत्खननादरम्यान नदीच्या काठावर दफन केलेले मृतदेह जमिनीबाहेर येत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या प्रकाराची गावकऱ्यांनी महसूल विभागाकडे तक्रार केली आहे. आमगाव तालुक्यातील मानेकसा येथील घाटावर रेती उत्खनन केले जाते. त्या ठिकाणी रेती उपसा करताना दोन प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती आहे. दरम्यान, या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दफन केलेले मृतदेह रेती उत्खननादरम्यान बाहेर येत असून, अवैध उत्खनन करणारे मात्र याकडे दुर्लक्ष करून रेतीची तस्करी करीत असल्याची माहिती आहे. मानेकसा रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन केले जात असल्याची माहिती आहे. महसूल विभागानेसुद्धा या रेती घाटावरून रेतीची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, यानंतरही रेतीचे अवैध उत्खनन सुरूच आहे. विशेष या परिसरातील गावकरी हे मानेकसा घाटावरच मृतदेहावर अंत्यसंस्कार व दफनविधी करतात. मात्र, रेतीचे तस्करी करणारे या घाटावरून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी करीत असल्याने या रेती घाटावरून कुठूनही रेतीचे उत्खनन करीत आहेत. परिणामी या घाटावर दफन केलेले मृतदेह बाहेर येत आहेत. त्यामुळे महसूल विभागाने या प्रकाराकडे लक्ष देऊन अवैध रेती तस्करीला आळा घालण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
मानेकसा येथे याच घाटावर अंत्यसंस्कार केले जातात. काही जण नदीकाठी मृत व्यक्तीचा दफनविधी करतात. मात्र, रेती उत्खननादरम्यान दफन केलेले मृतदेह बाहेर आले याची आपल्याला माहिती नाही. यासंदर्भात माहिती घेतो.- मिलिंद मेश्राम, पोलीस पाटील, मानेकसा
मानेकसा येथील रेती घाटावर आपण प्रत्यक्ष भेट देऊन पंचनामा करणार आहे. तसेच याप्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश संबंधित कर्मचाऱ्यांना दिले आहे. अवैध रेती तस्करीला पूर्णपणे आळा घातला जाईल. -अनमोल सागर, उपविभागीय अधिकारी, देवरी