शेतकरी समस्याग्रस्त : शेती पाण्याअभावी धोक्यातआमगाव : ओवारा प्रकल्पाचे पाणी तालुक्यातील कवडी, सोनेखारी, वळद, येरमडा व इतर गावांना सिंचनासाठी मिळते. मात्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या हुकुमशाहीमुळे अनेक वेळा शेतकऱ्यांना फटका बसत असतो. येरमडा येथील शेतकऱ्यांना रबीकरिता पाणी देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी रबीची लागवड केली, मात्र आता परिस्थिती गंभीर असून शेतकऱ्यांचे रबीतील पीक पाण्याअभावी वाळत आहे. त्या शेतकऱ्यांना तत्काळ पाणी देण्याची मागणी जि.प.सदस्य जियालाल पंधरे यांनी केली आहे. ओवारा प्रकल्पाचे पाणी परिसरातील शेतकऱ्यांना वेळोवेळी धान उत्पादनासाठी मिळत नाही. अनेकदा मागणी करून अधिकारी निमित्त करून पाणी देण्यासाठी टाळाटाळ करतात. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. परिणामी रबी असो की खरीप असो, शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. ठिकठिकाणी कालवे फुटलेले आहेत, भेगा पडल्या आहे. मात्र अधिकारी आपल्या मनमर्जीने पाणी सोडतात. काळव्याचे काम जेव्हा अधिकाऱ्यांनी वेळ मिळतो तेव्हा करतात. मात्र शेतकऱ्यांची समस्या कशा प्रकारे सोडविली जाऊ शकते, याचे नियोजन अधिकाऱ्यांना नाही. अनेकदा समस्यांचे निवेदन देऊन समाधान काढत नाही. अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन समस्या सोडविण्याची मागणी पंधरे यांनी केली असुन कार्यालयावर मोर्चा काढण्याची तयारी त्यांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी)
ओवारा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची हुकुमशाही
By admin | Published: March 03, 2017 1:17 AM