गोंदिया : कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असून, नवीन रुग्णांची नोंद झाली नाही. रविवारी (दि.२६) तीन बाधितांनी कोरोनावर मात केली, तर नवीन रुग्णांची नोंद झाली नाही. त्यामुळे कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ४ वर आली असून, जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे दिलासादायक चित्र आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने रविवारी १८१ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात १३३ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर ४८ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एकही नमुना कोरोनाबाधित आढळला नाही. त्यामुळे कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट शून्य होता. काेरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४५३९६४ बाधितांची चाचणी करण्यात आली. यात २३३१९७ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर २२०७६७ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४१२२० नमुने कोरोनाबाधित आढळले, तर ४०५०९ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ४ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, यापैकी दोन गोंदिया, तर दोन आमगाव तालुक्यातील आहेत.
.......
सहा तालुके कोरोनामुक्त
गोंदिया आणि आमगाव तालुके वगळता जिल्ह्यातील इतर सहा तालुक्यांत एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. त्यामुळे मागील पंधरा दिवसांपासून हे तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्याचे दिलासादायक चित्र आहे. सद्य:स्थितीत चार कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे.
............
नियमांचे करा पालन
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग जरी आटोक्यात असला तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांकडे दुर्लक्ष करू नका. मास्क, सॅनिटायजर यांचा नियमित वापर करा, गर्दीच्या ठिकाणी शक्यतो जाणे टाळा, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्या, नियमांचे काटेकोरपणे पालन करा, तर जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त ठेवण्यास मदत होईल.