गोंदिया : मागील दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी (दि.७) जिल्ह्यात दोन कोरोनाबाधितांची भर पडली, तर एका बाधिताने कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ९वर पोहचली आहे, तर कोरोनामुक्त असलेल्या देवरी तालुक्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना काळजी घेण्याची गरज आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने २९८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी १७२ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर १२६ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात २ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.५ टक्के होता. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४,४८,९०६ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी २२९२०८ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २१९६९८ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी ४१,२१० नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. यापैकी ४०,४९७ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत नऊ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे. मागील दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे चार तालुक्यांत कोरोनाचा संसर्ग झाला असून, चार तालुके कोरोनामुक्त आहेत. कोरोना बाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता जिल्हावासीयांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.
................
८ लाख ३८ हजार नागरिकांचे लसीकरण
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात लसीकरण हे महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळे लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यातील एकूण १२ लाख ६५ हजार नागरिकांचे लसीकरण करायचे असून, यापैकी आतापर्यंत ८ लाख ३८ हजार ७३६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
................
नियमांचे करा पालन
कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. बाजारपेठेतील गर्दी सुद्धा वाढली आहे, तर पुढे सणासुदीचे दिवस असून, गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी हे सण उत्सव सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.
- डॉ. विकास जैन, अध्यक्ष, आयएमए, गोंदिया
......................
स्वत:ची आणि कुटुंबांची काळजी घ्या
मागील दोन दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांना अधिक काळजी आहे. कोरोनाचा संसर्ग पुन्हा पाय पसरू नये यासाठी सर्वांनी कुटुंबांची आणि स्वत:ची काळजी घेत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करा.
- डॉ. सुवर्णा हुबेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी केटीएस
................
आपली सुरक्षा आपल्याच हाती
कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू न देणे हे सर्वस्वी नागरिकांच्या हातात आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कारण आपली सुरक्षा आपल्याच हातात आहे.
- सविता बेदरकर, सामाजिक कार्यकर्ता