गोंदिया : जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीला हळूहळू ब्रेक लागत असून रुग्णसंख्या सुध्दा आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. शनिवारी (दि.९) जिल्ह्यात १७ बाधितांची नोंद झाली तर २५ बाधितांनी कोरोनावर मात केली. कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात येत असून जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
जिल्ह्यात शनिवारी आढळलेल्या १७ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक १२ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. गोरेगाव १, आमगाव १, सालेकसा २, देवरी तालुक्यातील १ रुग्णांचा समावेश आहे. मागील आठ दहा दिवसांपासून कोरोना रुग्ण वाढीला बऱ्याच प्रमाणात ब्रेक लागला असून कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २५९ वर आली आहे. त्यामुळे जिल्ह्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे दिलासादायक चित्र आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत ५९०२९ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले आहे. त्यापैकी ४७५५६ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जात आहे. या अंतर्गत ६१२९५ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ५५३१६ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १३८९१ कोरोना बाधित आढळले असून यापैकी १३४५४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात २५८ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून ५९ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.