गोंदिया : सलग चौथ्या दिवशी सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जिल्ह्यात सर्वदूर हाह:कार उडविला आहे. गोंदिया शहरासह संपूर्ण जिल्ह्यात यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान नदी-नाल्यांना पूर आले असून सालेकसा तालुक्यातील मरकाखांदा येथील श्रीराम केशव नवखरे (६२) हे नाल्यातून गावाकडे येत असताना पुराच्या पाण्यात वाहून गेले. गावातील शाळेच्या जवळ त्यांचा मृतदेह आढळला. याशिवाय अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे.सकाळी ८ वाजता घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासात आठही तालुक्यात सरासरी १३१.७८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. सर्व तालुक्यात ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे अतिवृष्टीची नोंद झाली आहे. वास्तविक आतापर्यंत पडणाऱ्या पावसाची सरासरी पाहता १ जूनपासून आतापर्यंत झालेला एकूण पाऊस जास्त नसला तरी गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने सुरू केलेल्या रोवण्याही थांबवाव्या लागल्या आहेत. अती पावसामुळे काही ठिकाणी नुकत्याच झालेल्या रोवण्याही वाया जाण्याची शक्यता असल्याचे शेंडा (कोयलारी) येथील वार्ताहराने कळविले.महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशला जोडणाऱ्या रजेगाव येथील बाघ नदीवरील पुलाला सोमवारी सायंकाळी पाणी टेकून पुलावरून पाणी वाहू लागले. त्यामुळे पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. मंगळवारी सकाळी पुलावर २० सेंटीमीटर पाणी होते. सायंकाळी हा प्रवाह वाढून ४ वाजता पुलावरून ५० सेमी पाणी वाहात होते. रात्री पाण्याची पातळी ३ फुटावर गेली होती. यामुळे गोंदिया-बालाघाट मार्गावरील वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. त्यातच पुजारीटोला धरणाचे ७ दरवाजे ७ फुटांनी तर आणि कालीसराड धरणाचे ४ दरवाजे १ फुटाने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हे पाणी बाघ नदीतून वाहून रजेगाव पुलापर्यंत आल्यानंतर पुलावरील पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे.अनेक ठिकाणी झाडे तुटून वीज वाहक तारांवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाल्या आहेत. नदी-नाल्यांना पूर आल्याने ग्रामीण भागातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. गोंदिया शहरात काही नागरी वस्त्या जलमय झाल्या आहेत. शहराच्या गौतमनगर येथील कैलास संतापे यांच्या घराची भिंत त्यांच्या अंगावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले. ही घटना दुपारी ३ वाजता घडली. त्यांना उपचारासाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. फुलचूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर राज्य मार्गावर असलेला निंबाचे विस्तीर्ण झाड रस्त्यावर कोसळले. सुदैवाने त्या ठिकाणी कुणीही नसल्यामुळे प्राणहाणी झाली नाही. आमगाव रस्त्यावरील बम्लेश्वरी मंदिरासमोर एका गाईचा पाण्यामुळे मृत्यू झाला. शहरातील काही शाळांचा परिसरही जलमय झाला आहे. दुपारी अनेक शाळांना वेळेपूर्वीच सुटी देण्यात आली. अनेक शाळा बुधवारीही बंद राहणार आहेत.देवरी : तालुक्यात रात्रीपासून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. देवरी परिसरात १२ ते १५ झाड जमिनदोस्त झाले. बोरगाव पुलावर पाणी असल्यामुळे देवरी-आमगाव संपर्क रात्रीपासून बंद आहे. देवरी-कन्हारगाव यांचा संपर्क तुटला आहे. परसटोला येथील तुकाराम नरेटी यांच्या घरावर झाड कोसळल्याने त्यांचे घर पडले आहे. सालेकसा : तालुक्यात झालेल्या संततधार पावसामुळे आमगाव-सालेकसा, सालेकसा-साखरीटोला संपर्क तुटला होता. नवेगावला पाण्याने वेढल्यामुळे नवेगावचा कोणत्याही गावाशी संपर्क होत नाही. बेवारटोला येथील धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे घनसा व धनेगाव धोक्यात आहे. दोन दिवसांपासून येणाऱ्या संततधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. मरकाखांदा येथील श्रीराम केशव नवखरे (६२) हे वाहून गेले. शाळेच्या जवळच त्यांचा मृतदेह आढळला. सालेकसा तालुक्यातील ८० टक्के शाळा बंद होत्या. सडक/अर्जुनी : सडक/अर्जुनी ते कोहमारा रस्त्यावर दीड फूट पाणी असल्याने नागरिकांना ये-जा करण्यास कसरत करावी लागली. कनेरी नाल्यावर पूर असल्यामुळे सडक/अर्जुनी, नवेगाव मार्ग बंद होता. खोडशिवणी ते खजरी, मोगरा ते सडक/अर्जुनी, दल्ली ते बाम्हणी हे मार्ग पावसामुळे बंद होते. कनेरी नाल्याला पूर आल्यामुळे कोसमघाट येथील शेतकरी गोपीचंद अंताराम चचाने यांचा एक बैल पुरात वाहून गेला. कोहमारा येथील लहानबाई सखाराम राऊत यांच्या घराची भिंत कोसळल्यामुळे त्यांनी दुसऱ्या घरी आश्रय घेतला.अर्जुनी/मोरगाव : नवेगाव ते गोठणगाव रस्ता बंद, कान्होली फाट्याजवळ झाड पडले. गोठणगाव येथील तलावाजवळ दोन ते तीन झाड पडल्याने रस्ता बंद पडला होता. या मार्गावरुन बसेसही बंद करण्यात आल्या. गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यात संततधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी वादळामुळे झाड पडले. मात्र कोणतीही जिवित हाणी झाली नाही. अर्जुनी/मोरगाव येथे पाऊस ९०.२ मि.मी., नवेगावबांध येथे ८५ मि.मी., बोंडगावदेवी येथे ९५.२ मि.मी., महागाव येथे ९२ मि.मी. तर केशोरी येथे सर्वाधिक ११४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. तिरोडा : तालुक्यात ६१ घरांचे आंशिक नुकसान झाले आहे. तर तीन ठिकाणी गोठे पडले असून त्यात एक बैल व तीन शेळ्या ठार झाले आहेत. तर भोंबोडी नाल्यावरुन पाणी जात असल्यााने गावचा संपर्क तुटला. धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे पूर्ण २३ गेट उघडण्यात आले आहे. कवलेवाडा, नत्थूटोली जवळील रस्त्यावरुन पाणी जात असल्याने हा रस्ता बंद करण्यात आला आहे. तसेच वडेगावजवळ सतोना वळण मार्गावर दीड फूट पाणी जात असल्याने हा रस्ता बंद आहे. तसेच तिरोडा गोंदिया मार्गावर पेट्रोलपंप समोर रस्त्यावरुन एक फूट पाणी वाहत आहे. शिवाय संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच शाळांनाही सुटी देण्यात आली. (ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून )
अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत
By admin | Published: July 23, 2014 12:03 AM