लोहारा : जवळील ग्राम ओवारा (ता.देवरी) येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेत येत्या २१ तारखेपर्यंत दोन शिक्षक न दिल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा सरपंच व शाळा व्यवस्थापन समितीने दिला आहे. ओवारा येथील शाळेत वर्ग एक ते सात असून पटसंख्या १४० आहे. या शाळेत सध्या एकूण पाच शिक्षक कार्यरत आहेत. येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापक बी.एस. उईके हे १० नोव्हेंबर २०११ पासून आजारी रजेवर आहेत व सहायक शिक्षक मंगेश बोरकर हे १५ जुलै २०१४ पासून २९ एप्रिल २०१५ पर्यंत बिन पगारी रजेवर असल्यामुळे वर्ग ७ व शिक्षक ५ असल्याकारणाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बी.जी. मिश्रा यांच्याकडे मुख्याध्यापकाचा अतिरिक्त कारभार असल्यामुळे ते वारंवार मिटिंगकरिता केंद्र शाळेत व पं.स.ला जात असतात. त्यामुळे फक्त ४ शिक्षक व वर्ग ७ अशी स्थिती असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी २१ आॅगस्टपर्यंत दोन शिक्षक दिले नाही तर आमसभेत कुलूप ठोको आंदोलनाचा ठराव संमत करून शाळेला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा ओवारा ग्रामपंचायत सरपंच कमल येरणे व शाळा व्यवस्थापन समितीने दिला आहे. (वार्ताहर)
ओवारा शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा
By admin | Published: August 16, 2014 11:33 PM