तिरोडा : जिल्ह्यात मान्सूनचे प्रत्यक्ष आगमन जूनमध्ये होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून बळीराजा पावसाची वाट पाहू लागला आहे. त्यानुसार लवकरच खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. खरीप हंगामासाठी कृषी विभाग सुद्धा सज्ज झाला असून तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील दोन्ही मंडलात कृषी सहायक व आत्मा कर्मचारी यांच्यामार्फत खरीप हंगामपूर्व बीज प्रक्रिया व बियाणांची उगवण क्षमता तपासणीबाबत प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येत आहे.
खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामपूर्व बीज प्रक्रिया व बियाणांची उगवण क्षमता तपासणीबाबत प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी के. एन. मोहाडीकर यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणातून शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया व बियाणांची उगवण क्षमता तपासणीचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कृषी विभागाकडून देण्यात येत आहे. भविष्यात उद्भवणाऱ्या कीड व रोग तसेच बियाणांची उगवण बरोबर होत नाही आणि वेळेवर बियाणांची भात नर्सरी, रोपवाटिका तयार करणे शक्य होत नाही. म्हणून तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बियाणांची बीज प्रक्रिया व उगवण क्षमता तपासणी करूनच पेरणी करावी, असे तालुका कृषी अधिकारी के. एन. मोहाडीकर यांनी सांगितले.