संतोष बुकावन।आॅनलाईन लोकमतअर्जुनी मोरगाव : नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व संकुल परिसर गोंदिया जिल्ह्याचे ‘नंदनवन’ म्हणून ओळखले जाते. हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेल्या कुशीत विसावलेला विस्तीर्ण जलाशय. दृष्टी जाईल तिथपर्यंत फक्त जलाशयाचे पाणी व हिरवळच दिसावी. हिरवळीचे प्रतिबींब पाण्यामध्ये पडून जणू हे पाणी हिरवेगार दिसावे अशा कातरवेळी निरव शांततेचा व त्या शांततेत आपलेच साम्राज्य भासवणाऱ्या असंख्य पक्षांचे अस्तीत्व अनुभवायचे असेल तर नवेगावबांधला यायलाच हवे. गोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या पूर्वेस असलेला. नवलाईने नटलेला. धानाचे कोठार म्हणून असलेल्या गोंदिया जिल्ह्यात निसर्गाने मुक्त हस्ताने विविध रंगांची उधळण केली आहे. नवेगावबांधमधील मुख्य आकर्षणाचे केंद्र म्हणजे विदेशी पक्षी होय. नवेगावबांधचा परिसर विशेषत्वाने डोंगराळ असून तेथील वनाचा एकूण विस्तार १३३ चौरस कि.मी. आहे. १२ नोव्हेंबर १९७५ साली नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान म्हणून शासनाने घोषीत केले. नवेगावचा परिसर वनस्पती सृष्टी, वन्यजीव सृष्टी आणि पक्षी सृष्टी यांनी समृद्ध व नटलेला आहे. हिवाळ््यात हजारोंच्या संख्येने स्थलांतरीत पक्षांचे येथे आगमन होते. तेव्हा मात्र पक्षी प्रेमींना नवेगावची वाट खुणावल्या शिवाय राहत नाही.
नंदनवन विजनवासात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 10:39 PM