गोरेगाव : तालुक्यातील ग्राम सिलेगाव येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक कमलेश मेश्राम यांच्या मार्गदर्शनात ‘शाळा बंद पण शिक्षण चालू’ या उपक्रमाअंतर्गत ‘शिक्षक आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, शिक्षकांनी पालक व विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांकरिता शारीरिकदृष्ट्या शाळा बंद आहेत. यामुळे पालकांच्या मनात शिक्षणाबाबत चिंता निर्माण झाली आहे. या सत्रात शाळा सुरू होतील की नाही, मुलांचे शिक्षण कसे होणार, ऑनलाईन शिक्षणाचे नियोजन कशा पद्धतीने राबविले जात आहे, पुस्तक वाटप, सेतू अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडणे, या विषयांवर प्रत्यक्ष भेटीतून चर्चा करण्यात आली. तसेच ऑनलाईन आलेला अभ्यास विद्यार्थी सोडवतात का? विद्यार्थ्यांची ऑनलाईन क्लाससाठी असलेली अल्प उपस्थिती यांची कारणे, विद्यार्थ्यांच्या अडचणी इत्यादी जाणून घेऊन त्यावर चर्चा करण्यात आली. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यासक्रम पोहोचवला जात असला तरी काही विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाहीत. अशा विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष भेटीतून संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. कोरोना जात नाही तोपर्यंत मोबाईल ही विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज म्हणून पाहावे. पालकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयी जागरूक राहून शिक्षणाच्या प्रवाहात आपला पाल्य कसा राहील, याकडे लक्ष द्यावे, असेही पालकांना समजावून सांगण्यात आले.
‘शिक्षक आपल्या दारी’ हा उपक्रम दररोज सुरू असून, त्याद्वारे विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला जाणार असल्याचे मुख्याध्यापक मेश्राम यांनी सांगितले. शाळेच्या या उपक्रमाचे पालकांनी कौतुक करून समाधान व्यक्त केले. या उपक्रमासोबतच कोरोनाविषयी पालक म्हणून आपली जबाबदारी काय असली पाहिजे, विद्यार्थ्यांची काळजी कशी घ्यावी, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामध्ये सुंदरसिंग साबळे, आर. वाय. डहाके, टी. वाय. भगत, यु. डी. चकोले इत्यादी शिक्षकांनी सहभाग घेतला.