गोंदिया : गोरगरिबांच्या मुलांना खासगी नामवंत शाळेत २५ टक्के मोफत प्रवेश देण्यासाठी शासनाने शिक्षण हक्क कायदा अंमलात आणला. या कायद्यांतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांच्या मुलांना आरटीईअंतर्गत प्रवेश देऊन त्याचा खर्च शासन सांभाळत आहे.
२०२१-२२ या शैक्षणिक वर्षात ८५४ विद्यार्थ्यांची लॉटरी काढण्यात आली. परंतु ७ जुलैपर्यंत फक्त २२३ विद्यार्थ्यांचाच प्रवेश निश्चित झाला आहे. ६३२ विद्यार्थ्यांनी प्रोव्हिजनली प्रवेश घेतला आहे. आमगाव तालुक्यात ८३ प्रवेश घ्यायचे होते, १७ प्रवेश निश्चित झाले आहेत. देवरी तालुक्यात ४१ प्रवेश घ्यायचे होते, २३ प्रवेश निश्चित झाले आहेत. गोंदिया तालुक्यात ३४८ प्रवेश घ्यायचे होते, १२४ प्रवेश निश्चित झाले आहेत. सालेकसा तालुक्यात ४० प्रवेश घ्यायचे होते, ३२ प्रवेश निश्चित झाले आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यात ४० प्रवेश घ्यायचे होते, २७ प्रवेश निश्चित झाले आहेत.
........................................
तीन तालुक्यात एकही ॲडमिशन नाही
अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ९३ प्रवेश घ्यायचे होते, परंतु एकही प्रवेश निश्चित झाला नाही. गोरेगाव तालुक्यात ७९ प्रवेश घ्यायचे होते, एकही प्रवेश निश्चित झाला नाही. तिरोडा तालुक्यात १३० प्रवेश घ्यायचे होते, परंतु एकही प्रवेश निश्चित झालेला नाही.
.......................
शाळांचे पैसे कधी देणार?
आरटीईअंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशाचे पैसे शासन देत आहे. परंतु मागील तीन वर्षांपासून आरटीईअंतर्गत प्रवेश देणाऱ्या शाळांचे पैसे शासनाने दिलेले नाहीत. त्यामुळे शाळा संचालकांना शाळा चालविणे कठीण होत आहे.
................
दुसऱ्यांदा मुदतवाढ
आरटीईच्या सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेशाला ३० जून मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ९ जुलैपर्यंत मुदतवाढ करण्यात आली होती.
................................
पालकांच्या अडचणी
सन २०२१-२२ या चालू शैक्षणिक वर्षामध्ये आरटीई २५ टक्के प्रवेशामध्ये निवड यादीतील बालकांचे प्रवेश पालकांनी शाळेत जाऊन करण्याची मुदत ३० जूनपर्यंत देण्यात आली होती. परंतु या प्रवेशासाठी ओटीपीच्या तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन प्रवेश होऊ शकला नाही.
- अतुल फुंडे, पालक
......
आरटीईच्या प्रवेशासाठी शाळेत गेल्यावर शाळांकडून योग्य मार्गदर्शन केले जात नाही. ओटीपीही योग्य वेळेवर येत नाही. आमच्या मुलांचा प्रवेश करण्यासाठी आम्ही तयार आहोत, परंतु प्रवेशासाठी सहकार्य करण्याची गरज आहे.
- नामदेव तावाडे, पालक
..........
आरटीईअंतर्गत जिल्ह्यात शाळांची नोंद - १४७
एकूण जागा - ८५४
आतापर्यंत झालेले प्रवेश - २२३
शिल्लक जागा - ६३१
..............
तालुकानिहाय शाळा आणि जागा
तालुका----------शाळा ------जागा------ रिक्त जागा
अर्जुनी-मोरगाव---१३ --------९३------------००
आमगाव-----------१२ --------८३------------ १७
देवरी----------------१० --------४१------------ २३
गोंदिया--------------५८ --------३४८------------ १२४
गोरेगाव--------------१६ --------७९------------ ००
सालेकसा--------------७ --------४०------------ ३२
सडक-अर्जुनी---------१० --------४०------------ २७
तिराेडा-----------------२१ --------१३०------------ ००
एकूण----------------१४७ --------८५४------------ २२३