अर्जुनी मोरगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षांपासून विद्यार्थी शाळा व शिक्षणापासून दुरावला आहे. ऑनलाइन शिक्षण प्रणालीमुळे तो पाहिजे त्या प्रमाणात समाधानी दिसत नाही. कोरोनाच्या प्रभावाने सर्वांत जास्त नुकसान विद्यार्थीवर्गाचे झाले आहे. ते वाचन-लेखन विसरले आहेत. त्यांच्या मनावर निराशेची काजळी निर्माण झाली आहे. शासनाने १५ जुलैपासून शाळा सुरू करण्यास हिरवी झेंडी दाखविल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनावरील निराशेची काजळी झटकून पालकांनो, मुलांचे भविष्य उज्वल करूया, असे उद्गार प्राचार्य अनिल मंत्री यांनी व्यक्त केले.
सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात १५ जुलैपासून शाळा सुरू करण्याच्या संदर्भात आयोजित पालक शिक्षक सभा, शाळा व्यवस्थापन समिती व कोरोना नियंत्रण समिती यांच्या संयुक्त सभेत अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष प्राचार्य अनिल मंत्री, जे. एम. बी. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विना नानोटी, पर्यवेक्षिका छाया घाटे, आरोग्याधिकारी डॉ. अमोल जाधव यांची उपस्थिती होती. सभेत राज्य शासनाच्या निर्देशानुसार कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर १५ जुलैपासून वर्ग ८ ते १२ चे प्रत्यक्ष वर्ग सुरू करणे, प्रत्यक्ष शाळा भरविण्याच्या दृष्टीने शाळेने केलेले नियोजन, ऑनलाइन वर्गातील पालकांचे अनुभव व चर्चा, पालक व विद्यार्थी यांनी शाळेत घ्यावयाची काळजी, संमतीपत्र, बससेवा, शाळा दोन सत्रांत भरविणे, वर्ग बारावीच्या निकालाचे काम सुरू असल्याने शिक्षक व्यस्त आहेत. म्हणून वर्ग उशिरा सुरू करणे यावर प्राचार्य अनिल मंत्री यांनी मार्गदर्शन केले. वरील सर्व ठराव पालकांनी एकमताने मंजूर करून शाळा सुरू करण्यासाठी संमती दर्शविली. लक्ष्मीकांत नाकाडे, मंजिरी भाकरे, अनिल हिरवे, शैलेश वालदे, ज्ञानेश कुंभारे, प्रतिभा भोंडे, भारती राऊत, अस्मिता वालदे यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आरोग्याधिकारी डॉ. अमोल जाधव व प्रा. टी. एस. बिसेन यांनी मार्गदर्शन केले. पालक शिक्षक समिती प्रमुख सुजित जक्कुलवार यांनीपालक शिक्षक समिती प्रमुख सुजित जक्कुलवार यांनी कार्यक्रमाचे संचालन केले व आभार मानले.