माकडांच्या हैदोसाने गावकरी त्रस्त
बाराभाटी : सध्या सगळीकडे शेतीची कामे सुरू आहे. शेतात नागरिकांची उपस्थिती असल्यामुळे माकडांनी गावाकडे धाव घेतली आहे. माकडे गावात येऊन घराचे व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. त्यांना पळविण्याचा प्रयत्न केल्यास ते अंगावर धाव घेतात. यातून एखाद्याला चावा घेण्याचा धोका टाळता येणार नाही. वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी गावकरी करीत आहेत.
दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर
गोंदिया : येथील रेल्वेस्थानक लगत प्रभू रोडवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. कित्येकदा त्यातून दुर्गंधसुद्धा पसरतो. त्यामुळे या परिसरात घाणच घाण पसरून दुर्गंधीयुक्त वातावरण तयार होते. परिणामी जनतेच्या आरोग्यावर प्रभाव पडतो. याकडे नगर परिषदेने लक्ष देऊन सफाई करण्याची गरज आहे.
वृक्षतोडीनंतर वृक्षांची सर्रास वाहतूक
अर्जुनी-मोरगाव : शेतशिवारासह जंगलात असलेल्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू झाली आहे. अनेकदा अशी वृक्षतोड करताना वनविभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र असे होताना दिसत नाही. वनविभागातर्फे कारवाई करण्यात दिरंगाई होत असल्याने जंगल नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.