गोंदिया : स्वच्छतेच्या उपक्रमांबाबत जनजागृती तथा लोकसहभाग वाढविण्यासाठी स्वच्छ भारत मिशनच्या हगणदरीमुक्त उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतींसाठी घोषवाक्य लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी सहभागी होऊन जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त करावा, असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी कळविले आहे.
१ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान विविध टप्प्यात ही स्पर्धा होणार आहे. गावातील सार्वजनिक जागा, बाजारपेठा, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, सार्वजनिक सभागृह, इमारती आदी विविध ठिकाणातील दर्शनी भागात घोषवाक्याचे लेखन करायचे आहे. शौचालयाचा नियमित वापर, लहान मुलांच्या विष्ठेचे व्यवस्थापन, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, गोबरधन, ओला व सुका कचरा, प्लास्टिक कचरा विलगीकरण अशा विविध विषयांवर घोषवाक्य लिहिता येणार आहेत. विजेत्या ग्रामपंचायतींची निवड ही उत्कृष्ट व जास्तीत जास्त घोषवाक्य लेखनाच्या आधारावर होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी आपल्या ग्रामपंचायत व त्या अंतर्गत येणाऱ्या गावांत अधिकाधिक घोषवाक्य लिहिण्यावर भर द्यावा, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर यांनी म्हटले आहे. घोषवाक्याचा आकार हा सहा बाय चार फूट असा असावा. तथा घोषवाक्यामध्ये सांस्कृतिक आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य, सर्वसमावेशक आणि आकर्षक मजकूर असणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत व त्या अंतर्गत येणाऱ्या सर्वच गावात ८ सप्टेंबरपर्यंत ही घोषवाक्ये लिहायची आहेत. ९ ते १५ सप्टेंबर दरम्यान ग्रामसेवकांनी सर्व घोषवाक्याचे छायाचित्रे एकत्रित गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करायची आहेत.