गोंदिया :जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. त्यातच काही जि.प. क्षेत्रातील बाहेरील उमेदवाराला उमेदवारी देण्याची चर्चा आहे. मात्र, याला संबंधित पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला आहे, तसेच बाहेरचे पार्सल नको असाच सूर जि.प. क्षेत्रात उमटत आहे.
स्थानिक जिल्हा परिषद प्रभागात कार्यक्षेत्रातील उमेदवाराच्या उमेदवारीला कार्यकर्त्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मतदार क्षेत्रातील कार्यकर्त्यांवर राजकीय सारिपाटात अतिक्रमण झाले, तर त्यास विरोध करून शहप्रतिशहाची भूमिका अंगीकारून आयात उमेदवारीला स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये विरोधाचा सूर आहे. मागील काही वर्षांपासून बोंडगावदेवी जिल्हा परिषद प्रभागात विविध राजकीय पक्षांकडून स्थानिक कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याची परंपरा आहे. मागील २० वर्षांपूर्वी काँग्रेसने मतदार क्षेत्राबाहेरील उमेदवार दिला होता. त्यावेळीसुद्धा स्थानिक कार्यकर्त्यांनी नाकारले होते, हे सर्वश्रुत आहे.
आजघडीला एका पदाधिकाऱ्याने सत्ताधारी राजकीय पक्षाकडे उमेदवारी मागितल्याची दमदार चर्चा सुरू आहे. याची चाहूल लागताच स्थानिक प्रभागातील सामान्य कार्यकर्त्यांनी आपल्या दबावतंत्राचा वापर सुरू केल्याचे राजकीय गोटात दिसून येत आहे. पार्सल उमेदवार नको, असा सावध पवित्रा घेतल्याचे कार्यकर्त्यांच्या हालचालीवरून स्पष्ट दिसून येत आहे.
आपल्या लॉबीला हेरून आयात उमेदवार सक्रिय दिसत असला तरी ‘अतिआत्मविश्वास’ नडला, तर स्वत:च्या पायावर दगड पाडण्याचा प्रकार तर होणार नाही ना? अशी चर्चा आहे. स्थानिक मतदार क्षेत्रातील उमेदवारीला प्राधान्य द्यावे, अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी यावर काय तोडगा काढतात याकडे नजरा लागल्या आहेत.