गोंदिया : तब्बल १८ महिन्यांच्या कालावधीनंतर रेल्वे विभागाने गोंदिया-बल्लारशा, गोंदिया-कटंगी, गोंदिया-बालाघाट, बिलासपूर-कटनी, तुमसर-तिरोडी, नागपूर-रामटेके-इतवारी या पॅसेंजर गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. या गाड्यांमध्ये तिकीट आरक्षित करून प्रवास करावा लागणार का, तिकीटदरात वाढ होणार का, असे अनेक प्रश्न प्रवाशांसमोर निर्माण झाले होते. मात्र, रेल्वे विभागाने या गाड्यांचे तिकीट पूर्वीएवढेच राहणार असून आरक्षण न करताच स्थानकावरून तिकीट घेऊन प्रवास करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने गोंदिया-बल्लारशा, गोंदिया-कटंगी, गोंदिया-बालाघाट, बिलासपूर-कटनी, तुमसर-तिरोडी, नागपूर-रामटेके-इतवारी या पॅसेंजर गाड्या सुरू करण्यासंदर्भात शुक्रवारी पत्रक काढले आहे. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून या गाड्या सुरू करण्यासाठी प्रवाशांच्या सुरू असलेल्या मागणीला अखेर पूर्णविराम लागला आहे. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता रेल्वे विभागाने मागील वर्षी मार्च महिन्यापासून सर्वच प्रवासी गाड्या बंद केल्या होत्या. मात्र, कालांतराने काही विशेष गाड्या सुरू केल्या. पण, पॅसेंजर आणि लोकलगाड्या सुरू केल्या नव्हत्या. त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी कोंडी झाली होती. शिवाय, गोरगरीब प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. तर, एसटीचे तिकीटदर हे दुप्पट असल्याने जवळच्या प्रवासासाठीसुद्धा अतिरिक्त पैसे मोजावे लागत होते. त्यातच रेल्वेने विशेष गाड्यांचे तिकीटदर हे दुप्पट ठेवल्याने पॅसेंजर आणि लोकलच्या तिकीटदरात वाढ होतेय का, ही चिंता प्रवाशांना सतावत होती. तसेच विशेष गाड्यांमध्ये तिकीट आरक्षित करून प्रवास करता येत असल्याने हाच नियम लोकल पॅसेंजरसाठी लागू राहणार का, अशी चिंता सतावत होती. मात्र, शनिवारी (दि. २५) रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पॅसेंजर आणि लोकलगाड्यांच्या तिकिटाचे दर पूर्वीप्रमाणेच कायम राहतील, असे सांगितले. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
.............
१६ रेल्वेस्थानकांवरील धूळ झटकणार
मागील १८ महिन्यांपासून लोकल आणि पॅसेंजर गाड्या बंद होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील १६ रेल्वेस्थानके केवळ नाममात्र सुरू होते. गाड्याच सुरू नसल्याने रेल्वेस्थानकांवरील तिकीट खिडक्यांवरसुद्धा धूळ बसल्याचे चित्र होते. मात्र, मंगळवारपासून गाड्या सुरू होणार असल्याने ही धूळ झटकली जाणार आहे.
...............
विक्रेत्यांना दिलासा
लोकल आणि पॅसेंजर गाड्यांवर अनेक छोट्या विक्रेत्यांचा व्यवसाय अवंलबून आहे. या गाड्या बंद असल्याने त्यांचा रोजगार हिरावल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली होती. मात्र, शुक्रवारी रेल्वे विभागाने पॅसेंजर व लोकलगाड्या सुरू करण्याची घोषणा केल्याने विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे.
.............