गोंदिया : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाइल चोरणाऱ्या एका चोरट्यास रेल्वे पोलिसांच्या पथकाने पकडले. त्याच्याकडून २८ हजार ९९९ किंमतीचे चोरलेले तीन मोबाइल जप्त करण्यात आले असून, गुरुवारी (दि.१) ही कारवाई करण्यात आली.
रेल्वे पोलीस पथक रेल्वेस्थानकावर गस्त घालत असताना फलाट क्रमांक-३ येथे अहमदाबाद-पुरी (०८४०५) ही गाडी उभी होती. सहायक उपनिरीक्षक एस. बी. थापा व प्रधान आरक्षक जी. आर. मडावी यांनी गाडीत एक व्यक्ती संशयास्पदरीत्या वावरत असल्याची माहिती दिली. पथकाने तत्काळ फलाट क्र. ३ कडे धाव घेतली. गाडी गेल्यानंतर पथकाने संशयिताला थांबण्यास सांगितले असता त्याने पळण्याचा प्रयत्न केला. पथकाने त्याला पकडून विचारपूस केली असता त्याने आपले नाव आकाश रहित मरकाम (१९,रा. बैगापार, छत्तीसगड) असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे ३ महागडे मोबाइल मिळून आले. तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. यातील एक मोबाइल त्याने ३ महिन्यांपूर्वी गाडीतच चोरल्याचे तसेच २ मोबाइल गुरुवारी (दि.१) पुणे-हटिया एक्स्प्रेसमधील प्रवाशांचे चोरल्याचे सांगितले. चोरलेल्या मोबाइलबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.