विजय मानकर
सालेकसा (गोंदिया) : सालेकसा ते आमगावदरम्यान १६ किलोमीटर रस्त्याची फारच दयनीय झाली आहे. नागरिक आणि वाहनचालकांना पावला पावलांवर खड्ड्यांचा जावे लागत आहे. एक खड्डा चुकवला तर दुसरा खड्डा सामोर येतो. परिणामी या मार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. तरी क्षेत्रातील लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभाग यानंतरही म्हणतो सगळं एकदम ओके आहे.
सालेकसा ते आमगाव या मार्गावर दररोज अपघात होत आहेत. अपघातामुळे प्रवाशांना रोज रुग्णालयात जाण्याची वेळ येत आहे. पण यानंतरही संबंधित बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधी या बाबींकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहेत. खड्डे बुजविण्याच्या बाबतीत किंवा रस्ता दुरुस्तीच्या बाबतीत संबंधित यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी एवढे अगतिक झालेले कधीच दिसून आले नाही. परिणामी सर्वसामान्य जनतेला व नेहमी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना आमगाव सालेकसा मार्गावर आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
या मार्गावर कावराबांध, गोवारीटोला, मुंडीपार, पानगाव लोंढे या गावाजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. पायी असो किंवा सायकलस्वार, असो की मोटारसायकल किंवा चारचाकी वाहन असो प्रत्येकाला खड्ड्याच्या सामना करूनच पुढे प्रवास करावा लागतो. पण हे खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापही सुरू केले नाही. परिणामी वाहन चालक आणि नागरिकांची समस्या कायम आहे.
आमचा जीव गेल्यावर खड्डे बुजविणार का?
सालेकसा ते आमगाव मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे समजण्यास मार्ग नाही. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून चार पाच जणांना अपंगत्वसुद्धा आले आहे. पण यानंतरही लोकप्रतिनिधी अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे आमचा जीव गेल्यावर रस्त्यावरील खड्डे बुजविणार का असा सवाल या परिसरातील नागरिकांकडून केला जात आहे.
शालेय विद्यार्थ्यांना बसतोय फटका
सालेकसा येथे शाळा व महाविद्यालय असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी सायकलने सालेकसा येथे येतात. पण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्यांनासुद्धा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे एखाद्या वेळेस अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांच्या पालकांमध्येसुद्धा चिंतेचे वातावरण आहे.