गोंदिया : अपयश हीच यशाची पहिली पायरी असते ही बाब मला योग्य वाटते. अपयशाने खचून न जात अपयशामागील उणिवा काय याचा शोध घेऊन त्या दूर करण्यावर मेहनत घ्या, थोडासा संयम बाळगा आणि पूर्वी इतक्याच आत्मविश्वासाने पुढे जा आणि कठोर परिश्रम घेण्याची तयारी ठेवा, ही यशाची त्रिसूत्री आत्मसात केल्यास नक्कीच यश मिळत असते. हीच माझ्या यशाची खरी त्रिसूत्री असल्याचे यूपीएससी उत्तीर्ण दिव्या गुंडे हिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
दिव्या ही गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांची कन्या होय. शुक्रवारी यूपीएससीचा निकाल जाहीर झाला. त्यात दिव्या उत्तीर्ण झाली असून, तिला ३३८ रँक मिळाला आहे. दिव्याची आई जिल्हाधिकारी, तर वडील नाशिक जि. प.मध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. दिव्याला लहानपणापासूनच प्रशासकीय सेवेविषयी ओढ होती. आई-वडील दाेघेही प्रशासकीय सेवेत असल्याने तीसुद्धा अनेकदा त्यांच्यासोबत ऑफिसमध्ये येत-जात असायची. त्यामुळे तिलासुद्धा प्रशासकीय सेवेत जाण्याची ओढ निर्माण झाली. दिव्याचे प्राथमिक शिक्षण सोलापूर, तर त्यापुढील शिक्षण नाशिक आणि पुणे येथे झाले. दिव्याने पुणे येथेच स्पर्धा परीक्षेची तयारी केली. आई-वडिलांचा तिच्यावर तिने प्रशासकीय सेवेत जावे यासाठी दबाव नव्हता. तुला मनापासून जे वाटते ते कर एवढी मोकळीक तिला आई-वडिलांनी दिली होती. मात्र, दिव्याचीच मनापासून प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा होती. २०१७ मध्ये तिने पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा दिली; पण तिला यात अपयश आले. पण ती खचली नाही. मात्र, तिसऱ्यांदा तिला जेव्हा अपयश आले, तेव्हा ती थोडी खचली, तिचा आत्मविश्वास थोडा डळमळला; पण दिव्या घेत असलेली मेहनत पाहत तिच्या आईने तिला धीर दिला. स्वत: आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून तिला मार्गदर्शन केले. मग दिव्यानेसुद्धा तिच्या अपयशातील उणिवा शोधल्या आणि त्या दूर करीत ती पूर्वीइतक्या आत्मविश्वासाने तयारीला लागली. तिने बाळगलेला संयम, आत्मविश्वास आणि घेतलेल्या कठोर परिश्रमाचे फलित म्हणजेच शुक्रवारी यूपीएससीचा निकाल जाहीर झाला आणि ती त्यात उत्तीर्ण झाली. ही तिच्यासाठी व आई-वडिलांसाठीसुद्धा तेवढीच आनंदाची बाब होती.
.................
दिव्याच्या अभ्यासासाठी पुणेला केली बदली
यूपीएससी परीक्षेसाठी दिव्या खूप परिश्रम घेत होती. तिचे परिश्रम पाहूनच आई (नयना गुंडेे) यांनी पुणे येथे बदली करून घेतली. तिथे तिला चांगले क्लासेस तसेच त्या स्वत: वेळात वेळ काढून मार्गदर्शन करीत होत्या. वडीलसुद्धा तिला वेळोवेळी मार्गदर्शन करीत होते. याचीसुद्धा तिला खूप मदत झाली.
.......
माझे घर हीच माझी प्रेरणा
आई-वडील दोघेही प्रशासकीय सेवेत असल्याने सुरुवातीपासून तिला या दोघांकडून वेळाेवेळी मार्गदर्शन मिळाले. यूपीएससीचा अभ्यास करताना तिला येणाऱ्या अडचणी ती आईच्या मदतीने सोडवीत होती. त्यामुळे यूपीएससी उत्तीर्ण होण्यासाठी तिचे घरच तिच्यासाठी प्रेरणा असल्याचे दिव्याने सांगितले.
......
स्वप्रेरणा महत्त्वाची
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संयम, आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि आपण जे करू ते मनापासून शंभर टक्के देऊन करू ही स्वप्रेरणा बाळगण्याची गरज आहे. एक-दोनदा अपयश आले तरी खचून न जाता त्यातील उणिवा शोधून त्या दूर करण्यासाठी मेहनत घ्यावी आणि कठोर परिश्रमाची तयारी ठेवावी, असा सल्ला दिव्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला.
.........
माझ्यासाठी अभिमानाची बाब
प्रत्येक आई-वडिलाला आपली मुले ही आपल्यापेक्षा मोठी व्हावीत, त्यांनी खूप उंची गाठावी असे वाटते. दिव्याने ही लहानपणी थोडी नटखट होती. त्यामुळे ती प्रशासकीय सेवेत जाणार की नाही याबाबत मला सुरुवातीला खात्री नव्हती; पण मागील चार-पाच वर्षे तिने खूप कठोर परिश्रम घेतले आणि ती यूपीएससी उत्तीर्ण झाली. ही खरोखरच माझ्यासाठी अभिमान व आनंदाची बाब आहे.
...............