अर्जुनी मोरगाव : कसलेही वैद्यकीय शिक्षण घेतले नसताना काविळीच्या नावाखाली रुग्णांना सलाइन लावून ॲलोपॅथीचा उपचार केला जात आहे. गोरगरीब, अशिक्षित लोकांची आर्थिक लूट करणाऱ्या बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे.
तालुक्यापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरी (महागाव) या ठिकाणी कसलेही वैद्यकीय शिक्षण न घेता, मागील अनेक वर्षांपासून अवैद्यरीत्या वैद्यकीय व्यवसाय करीत आहे. हा बोगस डॉक्टर काविळीच्या रोगावर जालीम उपचार करीत असल्याचे सांगितले जाते. रुग्ण त्याच्याकडे गेल्यावर त्याला रक्ताची चाचणी एका ठरावीक लेबॉरेटरी मधूनच करायला लावतो. या लेबॉरेटरी चालकासोबत त्याचे आर्थिक साटेलोटे असल्याने, कावीळ नसतानाही कावीळ दाखवून बरेच दिवस काविळीवर उपचार करीत असतो. मग परत कावीळ कमी झाली की नाही, यासाठी त्याच ठरावीक लेबॉरेटरीमध्ये रक्त तपासणी करण्यासाठी पाठवितो. त्यानंतर, हा लेबॉरेटरी चालक काविळीचा सामान्य अहवाल देत असतो. हा गोरखधंदा अनेक वर्षांपासून चालत असल्याची माहिती आहे. वास्तविकता बोरी येथील या कथित बोगस डॉक्टरकडे वैद्यकीय शैक्षणिक अर्हता नाही. लेबॉरेटरीतील रक्ताचा अहवाल कळत नसतानाही पंधरा-वीस दिवसांत रुग्णांना कावीळ नसताना काविळीच्या नावाखाली दररोज सलाइन व औषधी देऊन रुग्णांकडून आर्थिक लुबाडणूक करून फसवणूक केली जात आहे. अशा बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.