बिरसी फाटा : गोरेगाव व तिरोडा नगरपंचायतीतील घरकूल लाभार्थ्यांचा निधीचा मार्ग मोकळा झाला आहे. सन २०१८ या वर्षी शहरातील पहिल्या डीपारमधील व दुसऱ्या डीपारमधील लाभार्थ्यांना पंतप्रधान घरकूल योजनेंतर्गत घरकूल मंजूर केला होता. या योजनेंतर्गत राज्य शासन व केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येत असताना, राज्य शासनाकडून पहिला हिस्सा लाभार्थ्यांना देण्यात आला होता. मागील ३ वर्षांपासून डीपीआरचा ३ कोटी ३३ लाख रुपयांचा उर्वरित निधी प्राप्त झालेला नव्हता. त्यामुळे लाभार्थ्यांना अनेक प्रकारे त्रास सहन लागत आहे.
दोन्ही तालुक्यांतील बहुतांश लाभार्थ्यांनी घरकूल झाल्यानंतर योजनेंतर्गत राज्य शासनाकडून देण्यात येणारा पहिला हिस्सा मिळाल्यानंतर, आपल्या राहत्या जुन्या घराला पाडून त्या ठिकाणी नव्याने बांधकामाला सुरुवात केली होती. त्यामुळे अनेक जण भाड्याच्या घरात राहत आहेत, तर काही झोपडीवजा घरात आपले वास्तव्य करीत आहे. त्यातच कोरोनामुळे रोजगार गेल्याने घराचे देणे परवडत नाही, तर पावसाळ्याला सुरुवात झाल्याने झोपडीत राहणाऱ्यांचेही हाल आहे. तेव्हा ही बाब खासदार सुनील मेंढे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी अनुदान मिळण्यास झालेल्या दिरंगाईबद्दल दिलगिरी व्यक्त केली. घरकुलासाठी आता निधी प्राप्त झाल्याने, अनेक लाभार्थ्यांची अडचण दूर झाली आहे.