परसवाडा : सध्या सर्वत्र कोरोनाने कहर केला असून, उद्योगधंदे सर्वच ठप्प पडले आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यातच मागील पाच महिन्यांपासून बोनसची रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांची पायपीट सुरु आहे. त्यामुळे शासनाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना बोनसची रक्कम त्वरित द्यावी, अशी मागणी भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पारधी यांनी केली आहे.
शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ७०० रुपयेप्रमाणे ५० क्विंटलपर्यंत बोनस देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती. खरीप हंगामात जिल्ह्यातील दीड लाखावर शेतकऱ्यांनी धानाची विक्री शासकीय धान खरेदी केंद्रावर केली. याला पाच महिन्यांचा कालावधी लोटूनही बोनसची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली. शासनाने शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन बोनसची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, अशी मागणी संजय पारधी यांनी केली आहे.