आमगाव : राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२१ चे नियमित वेतन अदा करण्यासाठी आवश्यक निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावा. अन्यथा २४ मे रोजी स्वगृही एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पाठविलेल्या पत्रातून दिला आहे.
राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याचे वेतन १ तारखेलाच अदा करण्याचा धोरणात्मक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. वेतनासाठी निधी उपलब्ध न झाल्यास उणे प्राधिकरणाद्वारे १ तारखेलाच वेतन अदा करण्याचेसुद्धा घोषित केले आहे. परंतु शासनाची अंमलबजावणी प्रशासन करीत नाही. एप्रिल २०२१ च्या नियमित वेतनासाठी आवश्यक असलेल्या निधीची मागणी शिक्षण विभागाने वित्त विभागाकडे केली आहे. परंतु वित्त विभागाने मागणीनुसार निधी शिक्षण विभागाला दिला नाही. तसेच उणे प्राधिकरणाद्वारे नियमित वेतन अदा करण्यासाठी मान्यतासुद्धा प्रदान केली नाही. त्यामुळे राज्यातील लाखोंच्या संख्येतील शिक्षक व त्यांचे कुटुंब एप्रिल २०२१ च्या वेतनापासून वंचित झाले आहे. राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२१ चे नियमित वेतन अदा करण्यासाठी आवश्यक निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा किंवा उणे प्राधिकरणाद्वारे नियमित वेतन अदा करण्यास मान्यता प्रदान करावी अन्यथा २४ मे रोजी स्वगृही एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पाठविलेल्या पत्राद्वारे दिला आहे.