लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दहावी आणि बारावीच्या वार्षिक परीक्षांचा काळ जवळ आल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच संतुलित व पौष्टिक आहारावर भर द्यावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
परीक्षेच्या तयारीत विद्यार्थी आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे तणाव आणि अस्वस्थता वाढते. हे टाळण्यासाठी सकस आणि हलका आहार आवश्यक आहे. तसेच मनःशांतीही तितकीच महत्त्वाची आहे, असे डॉक्टरांचे मत आहे. परीक्षेच्या काळात खानपानाच्या वेळा नियमित असाव्या. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत नाश्ता, त्यानंतर चार ते साडेचार तासांनी दुपारचे जेवण घ्यावे.
काय खायला देऊ नये?परीक्षेच्या काळात तेलकट, तिखट आणि मसालेदार पदार्थ टाळावे. बाहेरचे जंकफूड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ. साखरयुक्त शीतपेय.
१८ हजार विद्यार्थी देणार बारावीची परीक्षाजिल्ह्यातील १८ हजार ७९४ विद्यार्थी ११ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा देणार आहेत. दहावी परीक्षेसाठी १८ हजार ५९२ विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे.
काय खायला द्यावे?मुलांना हलका आहार द्यावा, लिंबूपाणी, ताक प्यायला द्यावे. त्यामुळे उत्साह वाढतो. तणाव व थकवा दूर होतो. नियमित आहारात बदल करू नये. प्रोटिन्स, झिंक, व्हिटॅमिन सी जीवनसत्त्व असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.
अभ्यास एके अभ्यास नको!'अभ्यास महत्त्वाचा असला, तरी पुरेशी विश्रांती आणि झोप तितकीच गरजेची आहे. सतत अभ्यासामुळे डोळ्यांवर ताण येतो, त्यामुळे मोबाइल आणि टीव्हीपासून दूर राहावे. सायंकाळी १५-२० मिनिटे चालल्याने उत्साह वाढतो आणि तणाव दूर होतो.
"परीक्षेच्या काळात पचायला जड अन्नपदार्थ नकोत. हिरवा भाजीपाला, दूध, सुकामेवा, फळांचा आहारात समावेश करावा. तिखट, मसालेदार व बाहेरचे अन्नपदार्थ टाळावे. पेपरला जाण्यापुर्वी पचायला जड आहार घेऊ नये. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पुरेशे पाणी प्यावे व हलक्या आहाराचा समावेश करावा."- डॉ. मोसमी ब्राम्हणकर, आहारतज्ज्ञ.
"परीक्षा काळात अभ्यासाला घेऊन विद्यार्थी तणावात असतात, मात्र मानसिक स्वास्थ्य सर्वात महत्त्वाचे आहे. पालकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, त्यांच्या मनातील पेपरची भीती दूर करावी आणि त्यांना आत्मविश्वास द्यावा."- डॉ. लोकेश चिरवतकर, मानसोपचार तज्ज्ञ