शासनाच्या योजना कुचकामी : परिस्थितीसमोर माता झाली हतबलवायगाव (निपाणी) : रुग्णांना आरोग्य सुविधा पुरविण्याकरिता शासन सदा तत्पर असल्याचे सांगण्यात येते. यात नागरिकांना आरोग्याच्या सेवा पुरविण्याकरिता विविध योजनाही राबविण्यात येत आहे. प्रसूतीपासून तर कॅन्सरपर्यंतच्या रुग्णांना शासनाकडून सेवा देण्यात येतात यावर कोट्यवधी रुपये खर्च होत आहे. असे असताना येथील सेवाग्राम रुग्णालयाचे देयक भरण्याकरिता रक्कम नसल्याने नुकतेच बाळंतपण झालेल्या महिलेवर सुटी घेण्याची वेळ आली. तिच्या गावच्या नागरिकांनी लोकवर्गणी करून रुग्णालयाचे देयक भरले. रुग्णालयात सुटी घेवून घरी आल्यावर सदर महिलेच्या बाळाची प्रकृती खालावली. मात्र आर्थिक परिस्थिती नसल्याने गावकऱ्यांनी त्या बाळाला वर्धेच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर तिथे उपचार सुरू आहे; मात्र त्याच्याजवळ आई नाही. केवळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखित ते बाळ असल्याचे सांगण्यात येत आहे. वर्धा तालुक्यातील वायगाव (नि.) नजीकच्या पाथरी (ममदापूर) येथे बापूराव गवळी (७८) यांचा परिवार वास्तव्यास आहे. घरी त्यांची पत्नी, मुलगी वंदना पायघने व एक परितक्ता मुलगी असा पाच जणांचा परिवार आहे. रोजमजुरी करून त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. या परिस्थितीत वंदनाची मुलगी करिश्मा श्यामराव डोंगरे हिला तिच्या पतीने गर्भवती अवस्थेत आणून सोडत पळ काढला. तिच्या प्रसूतीची वेळ आल्यावर तिला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सेवाग्राम रुग्णालयात प्रसुती नंतर निघालेले देयक भरणे शक्य झाले नाही. अखेर वंदना हिने गावच्या सरपंच दुर्गा मडावी यांच्यासोबत चर्चा करून गावातून वर्गणी गोळ करीत रुग्णालयाचे देयक भरून मुलीला व नातवाला घरी आणले. घरी आणल्यानंतर पुन्हा प्रकृती खालावल्याने गावातील सरपंच व नागरिकांनी मुलीला व त्या शिशूला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. यात मुलाची व आईची देखभाल करण्याची परिस्थिती नसल्याने शिशूला दवाखान्यात दाखल करून आईला घरी आणल्याची माहिती आहे. या परिवाराला शासकीय मदतीची मागणी आहे.(वार्ताहर)
लोकवर्गणीतून भरले रुग्णालयाचे देयक
By admin | Published: October 05, 2015 2:14 AM