साखरीटोला : येथील विदर्भ ग्रामीण पतसंस्थेत एक कोटी १० लाख ८७ हजार १९४ रुपयांची अफरातफर करून मागील २ वर्षांपासून फरार असलेल्या संस्था अध्यक्ष तथा अभिकर्ता योगेशसिंह शेरसिंग बैस व संचालक (रेकार्ड लिखाण करणारा) प्रल्हाद भाऊदास राऊत या दोघांना न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि. २६) पोलीस कोठडी सुनावली आहे.
विदर्भ ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचा अध्यक्ष तथा अभिकर्ता योगेशसिंह बैस, संचालक (रेकार्ड लिखाण करणारा) प्रल्हाद राऊत, संस्थेची कर्मचारी अल्का योगेशसिंह बैस यांनी संस्थेतील ठेवीदारांनी ठेवीच्या स्वरुपात जमा केलेल्या पैशांच्या कॅशबुकमधील रोख शिल्लक घटवून संस्थेच्या बँक खात्यातून एक कोटी १० लाख ८७ हजार १९४ रुपयांची अफरातफर केली होती. त्यांच्यावर सालेकसा पोलिसांनी भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, ३४ सहकलम ३ महाराष्ट्र ठेवीदाराच्या (वित्तीय आस्थापनेमधील) हितसंबंधाचे संरक्षण करण्याबाबतचा अधिनियम १९९९ अन्वये गुन्हा दाखल केला होता. मात्र, बैस व राऊत हे मागील २ वर्षांपासून फरार होते. सालेकसा पोलिसांनी त्यांना २० जुलै रोजी अटक केली होती. या प्रकरणातील आरोपींचा पोलीस कोठडीत मुक्काम वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.