गोंदिया : विरोधकांकडे सध्या कुठलेच मुद्दे नसल्याने ते भाजपवर टीका करण्याचे काम करतात. त्यांच्याकडे टीका करण्यापलीकडे दुसरे कुठलेच काम राहिले नाही. उद्धव ठाकरे यांच्यावर आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे नैराश्येत गेले असून, ते कुठलेही वक्तव्य करीत असतात, अशी टीका राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी केली.
मंगळवारी (दि. १८) ते गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात खा. संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले होते. यावर राज्यमंत्री पंकज भोयर यांनी खा. संजय राऊत यांचे आरोग्य सध्या बरोबर आहे असे वाटत नाही. ते सकाळी मीडियासमोर येऊन काहीही बडबड करीत असतात. संजय राऊत हे जबाबदार व्यक्तिमत्व असून, त्यांची प्रत्येक गोष्टीची माहिती घेतल्यानंतरच वक्तव्य करावे, असा सल्लादेखील यावेळी भोयर यांनी संजय राऊत यांना दिला. महायुतीच्या काही आमदारांची सुरक्षा काढण्यात आली. यावर मंत्री पंकज भोयर यांना विचारले असता, महायुतीमध्ये सर्व आलबेल सुरू असून, सुरक्षेच्या कारणावरून कुठलाही तणाव नाही. तर सुरक्षेसाठी एक वेगळा विभाग असून, सहा महिन्यांतून, बारा महिन्यांतून सर्व्हे करून कुणाला किती सुरक्षा द्यायला पाहिजे ते ठरवत असल्याचे सांगितले.
बीड प्रकरणात गृह विभाग अत्यंत गंभीरबीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील काही आरोपी अद्यापही फरार आहेत. यावर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना विचारले असता, या प्रकरणातील जवळजवळ सर्व आरोपींना अटक झालेली असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणावर गृह विभाग अत्यंत गंभीर असून, योग्य पद्धतीने चौकशी सुरू असल्याचे सांगितले.