गोंदिया : पश्चिम बंगालच्या निवडणुकीला घेऊन भाजपने आकड्यांचा खेळ सुरू केला आहे. तसेच विजयाचा अतिआत्मविश्वास बाळगून हम करे सो कायदा हे धोरण अवलंबले होते. मात्र, पश्चिम बंगाल येथील जनतेने भाजपला नाकारले आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागण्यात आला होता. तेव्हा त्यांनी जनता राजीनामा मागेल तर देऊ, असे सांगितले होते. मात्र, आता पश्चिम बंगालच्या जनतेने भाजप विरुद्ध स्पष्ट कौल दिला असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावाअशी मागणी राज्याचे अल्पसंख्याकमंत्री तथा पालकमंत्री नवाब मलिक यांनी केली.
पालकमंत्री नवाब मलिक हे रविवारी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. पालकमंत्री नवाब मलिक म्हणाले, भाजप नेत्यांनी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आकड्याचे गणित मांडत विजयाचा अतिआत्मविश्वास बाळगला होता. तोच अतिआत्मविश्वास भाजपला नडला आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या भाजपने सर्वच फंडे उपयोगात आणले. मात्र, त्याचा कसलाच उपयोग झाला नाही. तेथील जनतेने परत एकदा तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत देत ममता दीदींवर विश्वास व्यक्त केला आहे. तर केवळ पोकळ आश्वासने देऊन जतनेची दिशाभूल करणाऱ्या भाजप सरकारला घरचा रस्ता दाखविला आहे. त्यामुळे जनतेनी दिलेला कौल मान्य करीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी मागणी पालकमंत्री नवाब मलिक यांनी केली.