गोंदिया : राज्यासह जिल्ह्यातही संसर्गाचा वेग कायम आहे. अद्यापही जिल्ह्यात परिस्थिती सावरलेली नाही. या पार्श्वभूमीवर सोमवारी माजी मंत्री डॉ. परिणय फुके, जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत आमदार फुके यांनी संताप व्यक्त करीत आरोग्य यंत्रणा दुरुस्त करून चाचण्यांची गती वाढविण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. तिरपुडे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, मुख्याधिकारी करण चव्हाण तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी तसेच सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी आमदार फुके यांनी जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचणीत............. होत असलेल्या चाचणीबद्दल.................... नाराजी व्यक्त केली. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत नवीन मशीन खरेदी करण्याचे निर्देश दिले होते ती अद्याप सुरू का झाली नाही, यावरही प्रश्न उपस्थित केला. तसेच चाचणी अहवालात विलंब होत असल्याने बाधित बाहेर फिरत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढत आहे. तेव्हा ॲन्टिजेन टेस्ट वाढविण्याचे निर्देशही दिले. याशिवाय ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र यामध्ये बेडची व्यवस्था केल्यास आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होईल असेही निर्देश दिले. एकंदरीत, आरोग्य यंत्रणा त्वरित बळकट करून रुग्णांची गैरसोय होणार नाही, असे निर्देश आढावा बैठकीत संबंधित लोकप्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाला दिले.