लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका जिल्ह्यातील १ लाख ९६ हजार हेक्टरमधील धान पिकांना बसला. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांनी हलक्या धानाची कापणी केली होती. त्या धानाच्या कडपा मोठ्या प्रमाणात भिजल्याने धानपिकाचे सर्वाधिक नुकसान झाले. दरम्यान नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश शासनाने दिले. यानंतर शनिवारी (दि.२) जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, महसूल, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचत नुकसानीची पाहणी केली. या वेळी आ.मनोहर चंद्रिकापूरे हे सुध्दा उपस्थित होते.परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यातील धान पिकांना बसल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणात पुढे आले होते.या दोन तालुक्यात परतीच्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात केवळ तणसच शिल्लक असून ती देखील जनावरांना खान्या योग्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला आहे.शेतकऱ्यांनी वर्षभर कुटुंबासह शेतात राबराब राबून आणि रक्ताचे पाणी करुन आणि कर्जाची उचल करुन खरीपाची तयारी केली. सुदैवाने यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने धानपिकाची सुध्दा चांगली स्थिती होती. त्यामुळे मागील दोन तीन वर्षांनंतर प्रथमच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव झळकत होते. मात्र मागील आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या सर्व आशा आणि अपेक्षांवर पाणी फेरले. दिवाळीपूर्वी अनेक शेतकऱ्यांनी हलक्या धानाची कापणी केली होती. कापणी केलेल्या धानाची लवकर मळणी आणि विक्री करुन दिवाळी साजरी करण्याचे स्वप्न शेतकरी पाहत होते. मात्र त्यांच्या स्वप्नावर परतीच्या पावसाने पाणी फेरले.काही शेतकऱ्यांच्या शेतातील धानाला कोंब फुटले असून काहीच उत्पादन होणार नाही. तर काही शेतकऱ्यांचे धानाच्या कडपा पाण्यात भिजल्याने मोठ्या प्रमाणात पाखड झाला. त्यामुळे त्याला सुध्दा मातीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.दरम्यान परतीच्या पावसाने नुकसान झाल्याची शेतकऱ्यांची ओरड वाढल्यानंतर शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरूवात केली आहे.शनिवारी जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदकिशोर नयनवाड आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सडक अर्जुनी,अर्जुनी मोरगाव तालुक्याचा दौरा करुन धान पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही अशी ग्वाही दिली.शेतकऱ्यांनी दाखविल्या धानाच्या कडपासडक अर्जुनी तालुक्यातील कोकणा जमी., पुतळी या गावातील धानपिकाचे परतीच्या पावसाने सर्वाधिक नुकसान झाले. शनिवारी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आ. मनोहर चंद्रिकापूरे यांनी सुध्दा या भागात पोहचत धान पिकाची पाहणी केली. तसेच जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांना धानपिकाच्या नुकसानीची माहिती देत शेतकऱ्यांचे कसे कंबरडे मोडले आहे हे सांगितले. या वेळी काही शेतकऱ्यांनी पावसामुळे कोंबे फुटलेल्या धानाच्या कडपा आणि किडरोगामुळे धानाची झालेली तणस जिल्हाधिकाऱ्यांना दाखवून नुकसानीची जाणीव करुन दिली. धानाच्या कडपा दाखवितांना शेतकऱ्यांचे डोळे पानावले होते.शेतकऱ्यांच्या अर्जांचा खचजिल्ह्यात परतीच्या पावसाचा फटका धानपिकाला सर्वाधिक बसला आहे. त्यामुळे तीन हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले असून ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला त्यांना पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई दिली जाणार आहे.मात्र यासाठी पीक विमाधारक शेतकऱ्यांनी अर्ज करणे आवश्यक आहे.त्यामुळे दोन दिवसात विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडे शेतकऱ्यांच्या अर्जांचा खच पडल्याची माहिती आहे.प्रत्येक दिवस, तास महत्त्वाचे आहेत. केवळ रिर्पोटिंग करण्यापेक्षा आधी नुकसानीचे पंचनामे करा. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांची नावे सुटली असतील त्यांनी लगेच कळवावे. दोन दिवसात पंचनामे तयार करुन तसा अहवाल कृषी, महसूल आणि पीक विमा कंपनीच्या यंत्रणेने द्यावा.- डॉ. कादंबरी बलकवडे,जिल्हाधिकारी गोंदिया..................................परतीच्या पावसामुळे खराब झालेला धान शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने शासनाकडे त्वरीत तयार करुन पाठवावा. पावसामुळे धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याचे वस्तूनिष्ठ सर्वेक्षण करुन एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची यंत्रणेने काळजी घ्यावी.- मनोहर चंद्रिकापुरे, आमदार.
लोकप्रतिनिधी,अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 6:00 AM
शेतकऱ्यांनी वर्षभर कुटुंबासह शेतात राबराब राबून आणि रक्ताचे पाणी करुन आणि कर्जाची उचल करुन खरीपाची तयारी केली. सुदैवाने यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने धानपिकाची सुध्दा चांगली स्थिती होती. त्यामुळे मागील दोन तीन वर्षांनंतर प्रथमच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव झळकत होते. मात्र मागील आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या सर्व आशा आणि अपेक्षांवर पाणी फेरले.
ठळक मुद्देसंडे अँकर । नुकसानीचे युद्धस्तरावर पंचनामे सुरु, नुकसानीचा आकडा वाढणार, किडरोगांचा प्रादुर्भाव वाढला