गोंदिया : जिल्ह्यात १ मार्चपासून नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व काही खासगी रुग्णालयात सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत लसीकरण करण्यात येत आहे. शहरातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी लस घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी केले आहे.
कोरोना लसीकरणास जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून सुरूवात झाली आहे. आतापर्यंत ४४ हजार ११६ नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणास जिल्ह्यात सुरूवात झाली आहे. ४५ ते ६० वर्षे वयोगटातील ६ हजार १४८ तर ६० वर्षांवरील १३ हजार ७१५ असे एकूण १९ हजार ८६३ ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली आहे. लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नागरिकांच्या सोयीसाठी लसीकरण केंद्र वाढविण्यात आले आहेत. लसीकरणासाठी पात्र असलेल्या व्यक्तींनी जास्तीत जास्त प्रमाणात लस घ्यावी यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी नागरिकांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेता आपल्या क्षेत्रातील पात्र नागरिकांना लस पूर्णपणे सुरक्षित आहे, याबाबत लसीकरण केंद्रावर लाभार्थ्यांना माहिती देण्यात येते. लस घेतल्यानंतर थोडा ताप किंवा अंगदुखीसारखे वाटण्याची शक्यता आहे. अशावेळी घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हा सल्ला शासकीय रुग्णालयात अगदी मोफत देण्याची सोय उपलब्ध आहे, असे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी म्हटले आहे.