गोंदिया : यावर्षी जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून शोध व बचाव पथकामार्फत त्यांचे मृतदेह रेस्क्यू करून काढण्यात आले. मान्सून कालावधीत वेगवेगळ्या घटनांमध्ये तत्काळ प्रतिसाद देऊन जीवित व वित्तीय हानीचे प्रभाव कमी करण्याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग व शोध बचाव पथकाने केलेली कामगिरी मोलाची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले.
आपत्ती व्यवस्थापन विभाग व शोध बचाव पथकाचा गौरव करण्यासाठी शुक्रवारी (दि.२४) आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, दीपक परिहार, आकाश चव्हाण, रूपचंद नाकाडे, सुपचंद लिल्हारे तसेच शोध व बचाव पथकाचे सर्व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना त्यांनी जिल्ह्यात राज्य आपत्ती प्रतिसाद दलचे (नागपूर) मार्गदर्शन घेऊन जिल्ह्यातील शोध बचाव पथकाची क्षमता बांधणी करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच प्रशासन व नागरिक हे समाजातील घटकांच्या दोन बाजू आहेत. अशा परिस्थितीत आपत्ती दरम्यान प्रशासन व नागरिकांनी एकमेकांशी समन्वय ठेवून पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी एकत्रित यावे. ‘सजग नागरिक-सुरक्षित नागरिक’ या सूत्राचे पालन करून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.
--------------------------
सेल्फीचा मोह टाळा
सद्यस्थितीत धरण, जलाशय, तलाव, नदी, नाले इत्यादींमध्ये पाण्याची पातळी वाढली असून अशा ठिकाणी पाण्याच्या प्रवाहात उतरू नये. तसेच या ठिकाणी सेल्फीचा मोह टाळावा व पाण्यात बोटिंग करताना लाइफ जॅकेटचा वापर करावा तसेच बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त नागरिकांनी बसू नये. पुलावरून पाणी वाहत असताना नागरिकांनी पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. तसेच या दरम्यान विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले.
-----------------------
शोध व बचाव साहित्यांची केली पाहणी
याप्रसंगी सहायक जिल्हाधिकारी अनमोल सागर यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात उपलब्ध असलेल्या शोध व बचाव साहित्यांची पाहणी केली. त्यांनी पूरपरिस्थिती दरम्यान शोध व बचाव कामात उपयोगी रबर-फायबर बोटी, लाइफ जॅकेट, लाइफबॉय, इमर्जंसी लाईट, ओबीएम मशीन, टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात आलेले फ्लोटिंग डिवाइस, सर्चलाईटची पाहणी केली. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाद्वारे पूर परिस्थिती दरम्यान करण्यात येणारी कामे, नागरिकांना सुरक्षित हलविण्याकरिता करण्यात येणारी उपाययोजना, जिल्हा नियंत्रण कक्षाचे संचालन, मानक कार्यपद्धती व पूर दरम्यान संबंधित सर्व विभागांचे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाचे कौतुक केले.