गोंदिया: सेजगाव खुर्द येथील मुख्याध्यापक एस.सी. पारधी यांना मानसिक त्रास देऊन त्यांच्या बदलीची मागणी करणारे लोक केवळ वैयक्तिक आकसापोटी ही मागणी करीत असल्याचे निवेदन गावातील लोकांनी दिले आहे. जयेंद्र बागळे यांनी पंचायत समितीमध्ये लोकांना खोट्या स्वाक्षऱ्या करून सदर मुख्याध्यापकांची तक्रार केली होती, असे शाळा व्यवस्थापन समितीकडून कळविण्यात आले आहे.पंचायत समितीकडून विस्तार अधिकारी एस.सी. पारधी यांनी सदर तक्रारीची चौकशी केली असता ती तक्रार खोटी असल्याचे आढळले. त्यानंतर जयेंद्र बागळे याच्याविरूद्ध मुख्याध्यापक एस.सी. पारधी यांनी महात्मा गांधी तंटामुक्त समितीकडे तक्रार केली. मात्र बागळे हे एकदाही बैठकीत उपस्थित झाले नाही. ते विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळा सोडण्यासाठी परावृत्त करीत असून शाळेतील विद्यार्थी संख्या कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे पालकांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे. बागळे यांचा पाल्य सदर शाळेत शिकत नसतानाही ते वातावरण बिघडविण्याचे प्रयत्न करतात. त्यामुळे सर्व पालक व शाळा व्यवस्थापन समितीस त्रास होत असल्याचे निवेदनात सांगण्यात आले.शाळेची बदनामी होते. त्यामुळे घटनेची चौकशी करून जयेंद्र बागळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजित खरोले, उपाध्यक्ष अमृत बिसेन, तंमुसचे अध्यक्ष लिखीराम गौतम, सदस्य सुनंदा पटले, ग्रामपंचायत सदस्य अशोक डोंगरे, भरतलाल टेकाम, मुकेश बारेवार आदी पदाधिकारी व अनेक नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)
मुख्याध्यापकांच्या बदलीमागे वैयक्तिक आकसभावना
By admin | Published: June 10, 2016 1:54 AM