सालेकसा : एचआयव्ही-एड्स हा संसर्गजन्य किंवा आनुवंशिक आजार नाही. एचआयव्ही चार कारणांमुळे होत असून एड्स ही अंतिम अवस्था आहे. एचआयव्हीसह व्यक्ती सकारात्मक सामान्य जीवन जगू शकतो, असे प्रतिपादन समुपदेशक नितीन फुलझेले यांनी केले.सालेकसा येथील मनोहरभाई पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने गिरोला येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर पार पडले. यात ‘एड्स समज-गैरसमज’ या विषयावर ते मार्गदर्शन करीत होते. ते पुढे म्हणाले की, समाजात संक्रमित व्यक्तीला जीवन जगताना त्याला बऱ्याच सामाजिक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशात त्याला समाजातून बहिष्कृत करणे, कामावरून काढून टाकणे, भेदाभेद करणे, कलंकित करणे या सर्व गोष्टी सहन कराव्या लागतात. मात्र असे करणे चुकीचे असते. याचे कारण म्हणजे एचआयव्ही स्पर्श केल्याने, हात मिळविल्याने, एकत्र काम केल्याने, सोबत जेवण केल्याने, एकाच शौचालयाचा वापर केल्याने, डास चावल्याने तसेच एकमेकांचे कपडे वापरल्याने होत नाही. ही समझ देवून समाजातील एड्सविषयी गैरसमझ दूर करणे अनिवार्य आहे. एड्स आजार शंभर टक्के बरा करून देतो, असे सांगणाऱ्या भोंदुबाबा किंवा बुवाबाजीपासून समाजाने सतर्क रहावे. कारण एड्स आजारावर अद्यापही लस किंवा या विषाणूला नष्ट करणारी औषध निघाली नाही, असे त्यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यक्रम अधिकारी प्रा. भगवान साखरे होते. मार्गदर्शक वक्ते म्हणून सालेकसा ग्रामीण रूग्णालयातील समुपदेशक नितीन फुलझेले होते. अतिथी म्हणून प्रा.डॉ. बाबुसिंग राठोड, प्रा. मेश्राम, प्रा. थेर, प्रा. अंबुले, गोविंद मरस्कोल्हे, परकिरवार, चेतन पंधरे, प्रियंका शहारे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व मनोहरभाई पटेल यांच्या छायाचित्राच्या पूजनाने झाली. यावेळी अध्यक्ष व अतिथींनी समयोचित मार्गदर्शन केले. संचालन तुलशी लिल्हारे यांनी तर आभार मिनाक्षी टेंभरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी पवन पातोडे, सरिता बिसेन, गीता राणे, डेव्हीड मेश्राम, सेवक शिवणकर, रंजू टेकाम, मिना लिल्हारे, गिरोला येथील महिला-पुरूष व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य केले. (प्रतिनिधी)
एचआयव्हीसह व्यक्ती सामान्य जीवन जगू शकतो
By admin | Published: January 18, 2015 10:46 PM