गोंदिया : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाच्या दरात वाढ झाल्याने मागील काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांतही सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी गोंदियात पेट्रोलचा दर १०४.७३ रुपये आणि डिझेलचा दर ९५.३३ होता. या दरवाढीमुळे नागरिकांसह व्यावसायिकही हतबल झाले आहेत.
आधीच लॉकडाऊनमुळे रोजगार आणि अनेक व्यवसाय ठप्प पडले आहेत. परिणामी, कित्येकांसमोर जगण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. आता इंधनाच्या दरातही वाढ झाल्याने सर्वसामान्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. लॉकडाऊन काळात रस्त्यावर धावणारी हजारो वाहने थांबली व त्याचा परिणाम इंधन विक्रीवर झाला. शहर आणि परिसरात दररोज पेट्रोल आणि डिझेलची लाखो रुपयांवर विक्री होते. मात्र, लॉकडाऊनच्या काळात इंधन विक्रीचे प्रमाण निम्म्यावर आले होते. त्याचा फटका पेट्रोल पंप मालकांना बसला. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली तरी बाजारपेठेतील उलाढाल थांबल्याने इंधन टाकण्यास नागरिक धजावत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे इंधनाच्या विक्रीवर परिणाम झाला असल्याची माहिती पेट्रोलपंप मालकांनी दिली.
राज्य शासनाने इंधनावर अधिभार वाढविला. केंद्र शासनाने इंधनाचे दर वाढविणे अथवा कमी करण्याचे अधिकार कंपन्यांना दिले आहेत. त्यामुळेदेखील इंधन दरवाढीत भर पडली आहे. मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुसाट वेगाने होत आहे. उल्लेखनीय म्हणजे, दररोज इंधनाच्या दरात वाढ होत आहे. एकीकडे कोरोना काळात अनेकांचा रोजगार बुडाला. त्यातही वाहन चालविणे गरजेचे झाले आहे. अशात दिवसेंदिवस होणारी इंधन दरवाढ नागरिकांकरिता डोकेदुखी झाली आहे.
वाढीचा परिणाम इतर वस्तूंच्या किमतीवर
इंधन दरवाढ झाल्यामुळे इतर वस्तूंचे दरदेखील आपोआप वाढतात. वस्तूंची ने-आण करण्याकरिता वाहतूक खर्च वाढतो. परिणामी, व्यापारी वस्तूंचे दर वाढवतात. शासनाने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींत सातत्याने होणारी वाढ नियंत्रणात आणावी, अशी मागणी होत आहे.
नागरिक झाले त्रस्त
शासन नागरिकांचे खिसे कापत असल्याचा आरोप वाहन चालकांकडून करण्यात येत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. दर दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. मंगळवारी गोंदियात पेट्रोल १०४.७३ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९५.३३ रुपये प्रति लीटर होते. डिझेलची शंभरीकडे झपाट्याने वाढ होत आहे. अशीच वाढ सुरू राहिल्यास डिझेल जुलैच्या पहिल्या आठवड्यात शंभरी पूर्ण करेल असे दिसते.