लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी (गोंदिया) : येथील एका परीक्षा केंद्रावर सोमवारी दि. १७ रोजी बारावी भौतिकशास्त्राचा पेपर लीक होऊन सर्व प्रश्न-उत्तरांची झेरॉक्स प्रत लोकमतच्या हाती लागली आहे. बारावी परीक्षेदरम्यान केंद्रावर सर्रास कॉपी सुरू असल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. या प्रकारामुळे कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.
शहरात त्याच शाळेत एक विद्यार्थी बारावीचा पेपर देत असताना त्याला हा प्रकार आढळून आला. त्याने लोकमत प्रतिनिधीला नाव न सांगण्याच्या अटीवर केंद्रावर मिळालेली झेरॉक्स प्रत दिली. झेरॉक्स कॉपीवर नऊ प्रश्नांची उत्तरे लिहिलेली आढळली. यावरून प्रश्नसंच बाहेर गेलाच कसा व त्याची उत्तरे सोडवून झेरॉक्स, सेंटरवरून केंद्रावर आली कशी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या प्रकारात केंद्रावर अधिनस्त असलेले शिक्षक सामील तर नाहीत ना, असा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे शिक्षण विभागाचे भरारी पथक तसेच महसूल विभागाचे भरारी पथक हातावर हात धरून बसले असल्याचे चित्र देवरी शहरात पाहावयास मिळत आहे. या प्रकारामुळे शिक्षण विभागाने जागे होऊन सर्व केंद्रांवर धाडी टाकून योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे.
शिक्षण विभाग म्हणतो, प्रकार घडलाच नाही कुणीतरी ३ वाजून ४०मिनिटांनी नवनीतची पाने टाकली आणि पेपर फुटला अशा वावड्या उठविल्या. त्या ठिकाणी आमचे बैठे पथक उपस्थित होते. असे काहीही घडलेले नाही अशी प्रतिक्रिया माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे, उपशिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर दिघोरे यांनीही हाच दावा केला.