नितीन गडकरी : राज्यमार्ग कोनशिला समारंभ गोंदिया : तुमच्या अपेक्षा पूर्ण करणे हेच आमचे कर्तव्य आहे. त्यातूनच सुमारे चार हजार चार कोटींची कामे जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आली असून लवकरच त्यांना सुरूवात होणार आहे. या विकास कामांचा शुभारंभ झाला असून ही तर सुरूवात असून ‘पिक्चर अभी बाकी है’ असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते परिवहन, महामार्ग आणि जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी केले. येथील नवीन ग्रेन मार्केटमध्ये शनिवारी (दि.२३) आयोजित राज्यमार्गांच्या कोनशिला समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमात मंचावर जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले, खासदार नाना पटोले, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, आमदार विजय रहांगडाले, संजय पुराम, गोपालदास अग्रवाल, माजी आमदार डॉ. खुशाल बोपचे, केशव मानकर, भजनदास वैद्य, खोमेश रहांगडाले, जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई मेंढे, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, वरिष्ठ नेते अशोक इंगळे आदि मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना नामदार गडकरी यांनी गोंदिया व भंडारा जिल्हा जंगलांचा जिल्हा आहे. त्याचा पर्यटनाच्या दृष्टीने फायदा असून विदर्भ पर्यटनासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले. तसेच लाखोळीच्या डाळीवर निर्बंध उठविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी धानासह लाखोळीचेही उत्पादन घ्यावे. शिवाय तणसापासून इथेनॉल तयार होत असल्याने त्याचा प्रयोग सुरू करून शेतकऱ्यांकडील तणस खरेदी केला जाणार. त्यातूनही शेतकऱ्यांना आर्थिक आवक होणार आहे. येणारा काळ शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक असून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मदत केली जाणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री बडोले यांनी, गडकरींनी पाच वर्षांचे टार्गेट एका वर्षातच पूर्ण केल्याचे म्हणत, दुर्भाग्याने जिल्ह्याला मागास जिल्हा म्हटले जाते. मात्र गडकरींची नेहमीच या जिल्ह्यावर नजर राहात असल्याने ही साडेचार हजार कोटींची कामे जिल्ह्याला मिळाल्याचे मत व्यक्त केले. खासदार पटोले यांनी, निवडणूकांपूर्वीचे हे भूमिपूजन नसून, आम्हाला निसर्गाने खूप काही दिले मात्र त्याला दिशा मिळाली नाही. त्यामुळे जिल्ह्यात पर्यटन व शेतीवर आधारीत उद्योगांची निर्मिती करण्याची मागणी गडकरींकडे केली. संचालन जिल्हा महामंत्री दीपक कदम यांनी केले. आभार भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)भव्य पुष्पहाराने स्वागतकार्यक्रमात जिल्हा भारतीय जनता पक्षाकडून ना.गडकरी यांचे भव्य पुष्पहाराने स्वागत करण्यात आले. त्यानंतर शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना एक हजार कोटींच्या निधीची मागणी करीत विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
पिक्चर अभी बाकी है
By admin | Published: January 24, 2016 1:42 AM