अर्जुनी मोरगाव : वडसा-कोहमारा राज्यमार्गावर बाराभाटीच्या पुलानजीक बांधकाम सुरू असताना नळ योजनेची पाइपलाइन फुटली आहे. यामुळे चार गावांचा पाणीपुरवठा १ जुलैपासून बंद झाला. हे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच मंगळवारपासून (दि.१३) पाइपलाइन दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे.
वडसा-कोहमारा प्रमुख राज्यमार्ग क्र. ११ वर बाराभाटीनजीक पुलाचे बांधकाम शिवालय कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत सुरू आहे. पुलाखालून खांबी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन गेली आहे. पुलाचे बांधकाम करतेवेळी ही पाइपलाइन फुटली. त्यामुळे सुकळी, खैरी, अरततोंडी व दाभना या चार गावांचा पाणीपुरवठा गेल्या १३ दिवसांपासून बंद आहे. संबंधित कामाचे कंत्राटदार याकडे कानाडोळा करीत होते. माजी जि. प. सदस्य किशोर तरोणे यांनी याची गोंदिया बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे लेखी तक्रार केली होती. ‘पाइपलाइन फुटल्याने चार गावांचा पाणीपुरवठा बंद’ या शिर्षकाखाली मंगळवारी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. वृत्त प्रकाशित होताच निद्रावस्थेत असलेले प्रशासन व संबंधित कंपनी खडबडून जागी झाली. मंगळवारी पाइपलाइन दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. आता या चार गावांच्या नळ योजनेची समस्या मार्गी लागेल.
130721\1523-img-20210713-wa0007.jpg
बाराभाटी पुलाखालून गेलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती करतांना