राजकुमार बडोले : रोहयोच्या कामांबाबत आढावा बैढकगोंदिया : जिल्ह्यातील मजुरांना जास्तीत जास्त दिवस रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यासाठी यंत्रणांनी सन २०१६-१७ या वर्षात करावयाच्या रोहयोच्या कामांचे १५ दिवसांत नियोजन करु न ती कामे तातडीने सुरु करावे, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सोमवारी १८ एप्रिल रोजी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आढावा घेताना पालकमंत्री बडोले बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, प्रभारी उपजिल्हाधिकारी (रोहयो) नरेंद्र लोणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, प्रत्येक यंत्रणेने जिल्ह्यातील आठही तालुक्यात प्रत्येकी पाच याप्रमाणे कामे सुरु करावी. रोहयोची कामे करताना यंत्रणा उदासीन असल्याचे दिसून येत आहे. ज्या यंत्रणांची कामे कमी प्रमाणात सुरु आहेत, त्यांना कारणे दाखवा नोटीस द्यावी. यंत्रणांनी ही कामे करताना वेळेचे बंधन पाळावे. यंत्रणांच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. रोहयोच्या मजुरांना केलेल्या कामांची मजुरी वेळेतच त्यांच्या खात्यात जमा करावी. यापुढे मजुरी वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी मजुरांच्या येणार नाही, या दृष्टीने यंत्रणांनी काम करावे. यंत्रणांनी रोहयोमधून नाला सरळीकरण, खोलीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घ्यावीत असे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाला यामधून हातभार लागणार आहे. त्यामुळे सिंचन क्षमता वाढीस मदत होणार आहे. प्रत्येक तालुक्यात यंत्रणांनी किमान पाच कामे तातडीने प्रशासकीय मान्यता मिळवून सुरु करावी. रोहयोची कामे करण्याचे यंत्रणांचे प्रमाण २० टक्केपेक्षाही कमी आहे, ते तालुकास्तरावर तहसीलदारांनी यंत्रणांच्या रोहयो कामाबाबत बैठका घेऊन नियोजन करावे असे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, रोहयोच्या कामात हयगय करणाऱ्या यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून प्रसंगी निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले, रोहयोच्या कामांची मागणी यंत्रणांनी आठ दिवसांच्या आत करावी. वन विभागाने वनतळ्यांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घ्यावीत. त्यामुळे वन्यजीवांना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता होईल. तातडीने कामांची प्रशासकीय मान्यता घ्यावी. रोहयोमधून गुरांचा, बकऱ्यांचा गोठा, शोषखड्डे तसेच प्रायोगिक तत्त्वावर रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी जिल्ह्यातील काही गावांची निवड करण्यात आली असून ऐन व अर्जुन वृक्षांवर टसर कीटक पालन तसेच तुतीची लागवड करावी. रोहयोमध्ये यंत्रणांचा सहभाग ४० टक्क्यांपेक्षा जास्त झाला पाहिजे असे सांगून डॉ. सूर्यवंशी म्हणाले, १ मेच्या आत २५ टक्के कामांना यंत्रणांनी प्रशासकीय मान्यता मिळवून घेऊन तातडीने कामे सुरु करावी. ज्या यंत्रणा रोहयोच्या कामाची मागणी करणार नाही, त्यांच्या वरिष्ठांना त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्याबाबत कळविण्यात येईल, असेही डॉ.सूर्यवंशी यांनी सांगितले. गावडे म्हणाले, जिल्हा डासमुक्त करण्यासाठी शोषखड्ड्यांची कामे रोहयोतून हाती घ्यावीत. दोन हजार १११ रूपये प्रति शोषखड्डा अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. रोहयोमधून शेतकऱ्यांच्या शेतीतील विहिरींची कामे, शौचालयांची कामे व वैयिक्तक लाभाच्या योजनांची कामे करण्यात यावीत, असे ते म्हणाले.सभेला लघु पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, गोंदिया पाटबंधारे, मध्यम प्रकल्प, बाघ इटियाडोहचे कार्यकारी अभियंता, वन विभागाचे सहायक वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. संचालन व आभार प्रदर्शन प्रभारी उपजिल्हाधिकारी (रोहयो) नरेंद्र लोणकर यांनी केले.(प्रतिनिधी)६,१९,३७० मजुरांची नोंदणीप्रास्ताविकातून प्रभारी उपजिल्हाधिकारी (रोहयो) नरेंद्र लोणकर यांनी जिल्ह्यात रोहयोची कामे मिळविण्यासाठी २ लाख २३ हजार ५४० कुटुंबातील ६ लाख १९ हजार ३७० मजुरांनी नोंदणी केल्याची माहिती दिली. ग्रामपंचायत स्तरावर १ हजार १४४ कामे सुरु असून यावर ३४ हजार ८२७ मजूर तर यंत्रणांच्या २५९ कामांवर ११ हजार ६२५ मजूर कार्यरत आहेत. सन २०१५-१६ वर्षात १८ एप्रिलपर्यंत १२४ कोटी ५७ लाख रूपये कामावर खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ ते १८ एप्रिल २०१६ या कालावधीत ७७५ विहिरींची कामे पूर्ण झाली असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी भांडारकर यांनी दिली.
१५ दिवसांत नियोजन करा
By admin | Published: April 21, 2016 2:10 AM