शेतकरी जोमात : ४,४७० क्विं. बियाणे व ३०,०५६ मे. टन खताची मागणी गोंदिया : कृषी विभागाच्या नियोजनानुसार १ नोव्हेंबरपासून रबी हंगामाचे कार्य सुरू झाले. मात्र खरिपाच्या धानाची कापणी लांबल्याने रबी हंगाम लांबल्याचे सांगितले जात आहे. कृषी विभागाने सध्या रबीसाठी २३ हजार ३१९ हेक्टर क्षेत्रात नियोजन केले आहे. तरी यात आणखी भर पडू शकेल, असे सांगण्यात आले आहे. रबी हंगाम सन २०१६-१७ साठी कृषी विभागाने नियोजन केलेल्या क्षेत्रासाठी चार हजार ४७० क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. यात महाबीजच्या तीन हजार ५२० क्विंटल बियाणे व इतर खासगी कंपन्यांच्या ९५० क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मात्र प्रत्यक्ष पुरवठा किती प्रमाणात करण्यात आला, ही बाब गुलदस्त्यात आहे. तसेच सध्याच्या नियोजनानुसार, रबी हंगामासाठी एकूण ३० हजार ०५६ मेट्रीक टन खताची मागणी करण्यात आली आहे. यात कॉम्प्लेक्स पाच हजार ३८० मेट्रीक टन, युरिया १२ हजार मेट्रीक टन व इतर उर्वरित समिश्र खते तसेच सुपर फॉस्पेटचा समावेश आहे. मात्र आतापर्यंत खतांचा पुरवठा किती प्रमाणात करण्यात आला, याची माहिती देण्यास अधिकारी टाळाटाळ करतात, असे समजते. विशेष म्हणजे ज्या जि.प.च्या संबंधित कर्मचारी-अधिकाऱ्यांकडे ही माहिती उपलब्ध आहे, ते रजेवर असून त्यांचा प्रभार गोंदिया पंचायत समितीमधील कृषी अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. ते अधिकारी नेहमीच संपर्क क्षेत्राबाहेर असल्याचे दिसून येत आहे. कदाचित दोन्ही ठिकाणचा भार सांभाळणे त्यांना कठिण ठरत असल्याचे समजते. यावर्षीच्या खरीप हंगामात सुरूवातीला पाऊस आला. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी रोपवाटिका घातल्या होत्या. मात्र त्यानंतर पावसाने दगा दिला. पुन्हा पाऊस आल्यावर त्यांनी रोपवाटिकेसाठी धानबियाणे रोवले. मात्र रोपवाटिकेला पाण्याची गरज असताना पाऊस पडला नाही. यानंतर पऱ्हे लावणीसाठी पावसाची प्रतीक्षा करावी लागली. तेव्हाही पाऊस लांबल्याने पऱ्हे उशीरा लागले. त्यामुळे कापणीसुद्धा विलंबाने झाल्याने यंदा रबी हंगामाची कामे लांबणीवर गेल्याचे शेतकरी सांगतात. तरी खरिपाचा कमीपणा भरून काढण्यासाठी आता शेतकरी जोमाने रबीच्या कामात गुंतले आहेत. (प्रतिनिधी) रबीची सुरूवात लाखोळी व जवसाने कृषी विभागाच्या नियोजनानुसार १ नोव्हेंबरपासून लाखोळी व जवस या रबी हंगामाच्या पिकांची लागवड सुरू झाली. तर गव्हू व हरभरा पिकाला पाण्याची गरज असल्यामुळे त्यांची लागवड १५ नोव्हेंबरनंतर झाली. डिसेंबर महिन्यापर्यंत शेतकरी रबी पिकांसाठी शेतीच्या कामात गुंतला होते. तर काही शेतकरी जानेवारी २०१७ मध्येही शेतकार्यात व्यस्त असल्याचे दिसून येते.
रबीसाठी २३,३१९ हेक्टरमध्ये नियोजन
By admin | Published: January 18, 2017 1:27 AM