विद्यार्थ्यांना सोयी देणार : समाजकल्याण सहा.आयुक्त मंगेश वानखडे नरेश रहिले गोंदिया सामाजिक न्याय विभाग मागासवर्गीय लोकांच्या सर्वांगिण विकासासाठी विभाग काम करते. मागास वर्र्गीयांची शैक्षणिक व आर्थिक उन्नती व्हावी याकरीता नेहमी विभाग प्रयत्नशील आहे. सहाय्यक आयुक्त म्हणून ६ फेब्रुवारी २०१६ ला गोंदिया येथे रूजू झालो. सहा महिन्याच्या कालावधीत आमच्या विभागामार्फत शासनाच्या राबविण्यात येणाऱ्या योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. दारिद्ररेषेखालील भूमिहीन अनुसूचित जातीच्या लोकांना कोरडवाहू ४ एकर व ओलीताची २ एकर जमीन देण्याचीही योजना या विभागामार्फत राबविण्यात येताच. या आर्थिक वर्षात १५० एकर जमीन वाटपाचे नियोजित करण्यात आले आहे. त्या संदर्भात देखील कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती विशेष समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त मंगेश वानखडे यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीतून दिली आहे. ते म्हणाले, विद्यार्थी, पालक व महाविद्यालयाच्या अत्यंत जीव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे शिष्यवृत्ती योजना आहे. या योजनामुळेच समाजातील अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास वर्गीय, विशेष मागास प्रवर्गातील मुलांना शिक्षणाची सोय झाली. गोंदिया जिल्ह्यातील २८ हजार २६२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तर महाविद्यालय स्तरावरील ३ हजार ९८८ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या अर्जात तृट्या असल्यामुळे ते प्रलंबित आहेत. ज्या महाविद्यालयाकडे अर्ज प्रलंबित आहे त्या करीता सहाय्यक आयुक्त कार्यालयातील कर्मचारी पुन्हा महाविद्यालयात भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. जेणे करून शंभरटक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल हा आमचा माणस आहे. शाळांमध्ये मुलींची उपस्थित वाढविण्यासाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २ हजार ५०८ विद्यार्र्थींनींना या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात आला आहे. अनुसूचित जातीच्या बचत गटांना ९० टक्के अनुदानावर मिनीट्रॅक्टर वाटप करण्यात येत आहे. त्याचे काम अंतिम टप्यावर आहे. भटकंती करणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमातींसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा लाभ गोंदिया तालुक्याच्या अदासी तांडा येथील लोकांना देण्याची कार्यवाही सुरू आहे. या विभागामार्फत मुलींचे चार वसतीगृह आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती निमित्त राज्यामध्ये ५० मुलींचे वसतीगृह मंजूर करण्यात आले. त्यात गोंदिया जिल्ह्यात चार वसतीगृह असून देवरी, गोंदिया व अर्जुनी-मोरगाव येथे वसतीगृह सुरू करण्यात आले. सडक-अर्जुनी येथील वसतीगृहासाठी भाड्याच्या इमारतीचा शोध घेणे सुरू आहे. इमारत मिळताच त्या ठिकाणी वसतीगृह सुरू करण्यात येईल.जिल्ह्यात मुलींचे दोन जुने वसतीगृह सुरू आहेत. एक नवीन मंजूर करण्यात आले आहे. मुलांसाठी एक वसतीगृह असून या वसतीगृहांमध्ये १८४ विद्यार्थी वास्तव्यास आहेत. वसतीगृहातील मुलांना राहणे, जेवण, पुस्तके, स्टेशनरी व इतर साहित्य पुरविले जात आहेत. इतर खर्चाकरीता येथील विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ६०० रूपये तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ५०० रूपये निर्वाह भत्ता देण्यात येते. मुलांसाठी एक तर मुलींच्या दोन निवासी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यात ३५४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना राहण्याची, जेवणाची, गणवेश, पुस्तके अश्या सोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील २७३ विद्यार्थ्यांना सैनिक व पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण देण्यात आले आहे. मुला-मुलींना स्पर्धा परीक्षेची ओढ लागावी यासाठी जिल्हा ग्रंथालयात जागा उपलब्ध करून देण्यात आली. त्यात ३०० विद्यार्थी या अभ्यासीकेचा लाभ घेत आहेत. शासनाच्या योजनेचा लाभ देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, असे मुलाखतीतून विशेष समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त मंगेश वानखडे यांनी सांगितले.
अनुसूचित जातीच्या भूमीहिनांना १५० एकर जमीन देण्याचे नियोजन
By admin | Published: August 13, 2016 12:11 AM