महावन महोत्सव कार्यक्रम : लक्ष्यांकापेक्षा जास्त केली वृक्ष लागवड लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : १ ते ७ जुलै दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात ४ कोटी वृक्ष लागवड करण्याचा महा वन महोत्सव कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला होता. त्यात लक्षांकापेक्षा सवाई वृक्ष लागवड करीत ५ कोटी वृक्ष लागवड झाली. याचेच अनुकरण करीत सालेकसा तालुक्यात सुद्धा ३ लाख ७५ हजारांच्या जवळपास वृक्ष लागवड करण्याचे लक्ष्यांक देण्यात आले होते. परंतु महा वन महोत्सवात उत्साहपूर्वक हातभार लावत एक पाऊल पुढे जात वन विभागासह इतर शासकीय, निमशासकीय कार्यालये आणि इतर स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ४ लाखांपेक्षा जास्त वृक्ष लागवड करण्यात आली. सालेकसाचे वन परिक्षेत्राधिकारी सदानंद अवगान यांच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद देत वन विभागाचे कर्मचारी आणि संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी लोक सहभागाचा आधार घेत तालुक्यात एकूण १५ रोपवन स्थळांवर तीन लाख ४२ हजार ४७९ रोपटे लागवडीचा लक्षांक ओलांडून त्यापेक्षाही जास्त झाडांची लागवड केली. या व्यतिरीक्त महसूल विभाग, पंचायत विभाग, शिक्षण विभाग, बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, पोलीस विभाग, रुग्णालये, आरोग्य विभाग, खासगी स्वयंसेवी संस्था, मिळून एकूण ६० हजारांपेक्षा जास्त रोपट्यांची लागवड करण्यात आली. यासाठी तहसीलदार, बीडीओ, गट शिक्षणाधिकारी, इंजिनियर डॉक्टर, प्राचार्य मुख्याध्यापक यांनी विशेष लक्ष देत वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी पार पाडला. वन विभागामार्फत हाती घेण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमांंतर्गत कडौतीटोला रोपवन क्षेत्रात १६ हजार ६६५ रोपट्यांची लागवड करण्यात आली. धनसुवा परिसरात १६ हजार ६६५ रोपट्यांची लागवड, कुलरभट्टी- १ रोपवन क्षेत्रात २७ हजार ७७५, कोसमतर्रा परिसरात सुदधा २७ हजार ७७९, लभानधारणी परिसरात ६ हजार ९९९ रोपटी लावण्यात आली. पोवारीटोला रोपवन क्षेत्रात २२ हजार २२०, कुलरभट्टी-२ रोपवन स्थळात २५ हजार, मरकाखांदा-१ परिसरात २२ हजार २२० रोपटे आणि मरकाखांदा-२ परिसरात ११ हजार ११० रोपटी लावण्यात आली. खैरीटोला परिसरात ११ हजार ११ हजार ११०, जमाकुडो परिसरात २७ हजार ७७५ आणि तिरखेडी रोपवन क्षेत्रात १६ हजार ६६५ रोपटी लावण्यात आली. साकरीटोला परिसरात २४ हजार २५०, निबा-१ रोपवन क्षेत्रात ४८ हजार ७५० आणि निंबा-२ रोपवन क्षेत्रात ३७ हजार ५०० रोपट्यांची लागवड करण्यात आली. एकंदरीत वन विभागामार्फत ३ लाख ४३ हजार रोपट्यांची लागवड करण्यात आली. वन विभागाने महा वन महोत्सव कार्यक्रम रीतसर पार पाडण्यासाठी प्रत्येक रोपवन स्थळावर एक समन्वयक कर्मचारी नियुक्त केला होता. या अंतर्गत कडौतीटोला येथे एम.आर.येटरे, धनसुवा क्षेत्रात एच.एस.रहांगडाले, कोसमतर्रा क्षेत्रात जी.एस.रहांगडाले, कुलरभट्टी-१ साठी पी.पी.साखरे, लभानढारणीसाठी एल.पी.बिसेन, पोवारीटोला येथे आय.झेड.शेख, कुलरभट्टी-२ साठी जे.एम.बघेले, मरकाखांदा-१ क्षेत्रात ए.बी.मेश्राम, मरकाखांदा-२ क्षेत्रात डी.एम.गौरे, खैरीटोला क्षेत्रात आर.ओ.दसरिया, जमाकुडो रोपवन क्षेत्रात एस.आर.रहांगडाले, तिरखेडी क्षेत्रात व्ही.आर.अवस्थी, साकरीटोला वन क्षेत्रात एस.जी.बुंदेले, निंबा-१ साठी सी.जी.मडावी आणि निंबा-२ रोपवन क्षेत्रात एस.एस.लांजेवार याची नेमणूक केली. या सर्वांनी आपल्या रोपवन क्षेत्रात वृक्ष लागवड व्यवस्थीतरित्या पूर्ण करुन त्याची देखभाल सुध्दा करीत आहेत. महसूल मंडळाला २४० रोपट्यांची लागवड करण्याचे लक्षांक होते. त्यात तहसील कार्यालय परिसरात ४० रोपटे तीन महसूल मंडळ परिसरात ९० आणि १७ तलाठी साझा क्षेत्रात १७० रोपट्यांची लागवड केली. शिक्षण विभागाअंतर्गत एकूण १४६ शाळांमध्ये ८७२ रोपट्यांची लागवड करण्यात आली. शिवाय काही शाळा, कॉलेजमध्ये स्वेच्छेने मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली. पंचायत समिती आणि ग्रामपंचायतच्या सहकार्याने जवळपास १५ हजारांपेक्षा जास्त रोपट्यांची लागवड करण्यात आली. लपा जि.प. बांधकाम विभागाने ९५ रोपट्यांची लागवड केली. या व्यतिरिक्त अनेक स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, बँका, दवाखाने, मंदिर परिसर आणि पोलीस स्टेशन परिसरात ही उत्साहपूर्वक वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेऊन रोपट्यांची लागवड केली.
तालुक्यात चार लाखांवर वृक्ष लागवड
By admin | Published: July 10, 2017 12:43 AM