बोंडगावदेवी : ‘ड्रम सीडर’ या कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून भारत पिकाची रोवणी आजघडीला शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे वारेमाप खर्चावर आळा घालता येतो. पीक उत्पादनात वाढ होते, असे प्रतिपादन कुंभीटोला येथील प्रयोगशील शेतकरी देवेंद्र राऊत यांनी केले.
खरीप हंगामाच्या प्रारंभी पाऊस चांगला बरसला; परंतु नंतर पावसाने दगा दिला. पावसाच्या लपंडावाने धानाचे पऱ्हे टाकता आले नाही. दुबार पेरणीची कसरत करावी लागली. हवामान बदलामुळे धान उत्पादनावर परिणाम होणार. कृषी विभाग गोंदिया तसेच ग्रामपंचायत कुंभीटोला यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ड्रम सिटर’ या कमी खर्चाचे तंत्रज्ञानाचा धान लागवडीसाठी वापर करून जिल्ह्यात नवीन प्रयोग कुंभीटोला येथील देवेंद्र राऊत यांच्या शेतावर शनिवारी (दि.१०) करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी नवेगावबांधच्या मंडळ कृषी अधिकारी कुमुदिनी बोरकर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे, सरपंच हिवराज औरासे, उपसरपंच शुभांगी राखडे, निर्मला राऊत, भीमराव चर्जे, आशा नाईक, भास्कर राऊत, पुंडलिक मारगाये, धनपाल तलमले, योगेंद्र राऊत उपस्थित होते. कुमुदिनी बोरकर यांनी शेतकऱ्यांना सांगितले की ड्रम सीडर हे तंत्रज्ञान वापरून धान बियाणांची रोप तयार न करता सरळ पेरणी करता येते. बियाणे रात्रभर पाण्यात भिजवून अंकुरित करावे. अंकुर लांब येऊ नये याची काळजी घ्यावी. धान बियाणे एकमेकांत अडकून ड्रम सीडरमध्येच राहण्याची शक्यता असते. भिजलेले बियाणे पेरणी पूर्वी सावलीत सुकवून कोरडे करावे. पेरणीपूर्वी शेतात चिखलणी करावी. यात खर्चाची बचत होते.
.............
तीन तासांत एक एकर रोवणी
ड्रम सीडरद्वारे रोवणी केल्यास दोन ओळींचे अंतर २०-२० सेंमी तर दोन रोपांतील अंतर ५ ते १० सेंमीपर्यंत कमी जास्त करता येते. चिखलणी केलेल्या समांतर शेतावर याचा वापर करता येतो. या पद्धतीत हेक्टरी ३५ ते ४० किलो बियाणे लागते. मजुरी खर्च कमी लागतो. उत्पादनात वाढ होऊन अपेक्षित उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. विलास कोहाडे यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. ड्रम सीडरचे वजन पाच-सात किलो असल्याने एक दोन मजुरांच्या साह्याने सरळ ओळीत सरळ धान रोवणी करता येते. एक एकरची लागवड तीन-चारा तासांत होते. ड्रम सीडरचा जास्तीत जास्त भाग प्लास्टिकचा असल्याने हलका आहे. कमी व्यवस्थापन असून शेतकऱ्यांना परवडणारे ठरते.