दीड एकरात पेरणी: हेमराज बोरकर यांचा प्रयोगबोंडगावदेवी : पारंपरिक पद्धतीला बगल देऊन नवनवीन तंत्रज्ञानाने शेती करण्याचा माणस आजघडीला शेतकऱ्यांनी अंगीकारल्याचे दिसत आहे. यात देऊळगाव-बोदरा येथील अल्पभुधारक शेतकरी हेमराज तुळशीराम बोरकर यांनी मागील दोन वर्षापासून जपानी श्री पद्धतीने धानाची लागवड करण्याचा प्रयोग सुरू केला आहे. सध्या महागाईच्या जमान्यात शेती करणे परवडत नाही. शेतीमधून उत्पादन घेण्यासाठी आवश्यक साधनाच्या किमती गगनाला भिडल्या. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या धानाला कवडीमोल भाव असल्याने शेतकऱ्याच्या नशिबी आत्महत्याचा अभिशाप अशी वास्तव परिस्थिती आज सर्वत्र दिसून येत आहे. अशी विदारक स्थिती असून देखील शेतकरी बोरकर यांनी आपली हिम्मत हारलेली नाही. बोरकर यांच्याकडे सव्वा तीन एकर शेतजमीन आहे. अल्पभुधारक असलेले बोरकर पत्नी व दोन मुलांना सोबतीला घेऊन अहोरात्र शेतामध्ये राबतात. शेती व्यवसायातूनच ते आपल्या प्रपंचाचा गाडा चालवितात. शेतामध्ये कोणतीही जलसिंचनाची सोय नसताना धाना बरोबर इतर पिके घेण्याचा त्यांचा कल आहे. धानाच्या रोवणी पद्धतीच्या शेतीला वारेमाप खर्च करुन सुद्धा मनासारखे उत्पन्न घेता येत नाही. यामुळे शेती करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्याचा मनोदय अंगीकारुन बोरकर यांनी जपानी श्री पद्धतीने धानाची लागवड करण्याचा नाविण्यपूर्ण प्रयोग राबविणे सुरु केला.दीड एकर शेतीमध्ये वारली जपानी श्री पद्धतीने धानाची पेरणी १३ जूनपासून त्यांनी सुरु केली. नऊ बाय सहा या अंतराने महिला मजुरांच्या सहकार्याने वारली जपानी पद्धतीने पदमशाही या धानाची पेरणी केली. वारली जपानी पद्धतीने धानाची लागवड केल्यानंतर किटकनाशक औषधांचा वापर करण्याची गरज भासत नसल्याचे सांगून एकरी १५ ते १६ क्विंटल धानाचे उत्पन्न घेत असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित विभागाकडून आजपावेतो कोणतीही सुविधा तसेच जलसिंचनाची सोय मिळाली नसल्याची खंत शेतकरी बोरकर यांनी लोकमतजवळ व्यक्त केली. नवनवीन प्रयोगाने शेती करणारे हेमराज आजघडीला शासनाच्या योजनांपासून कोसो दूर असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)
जपानी ‘श्री’ पद्धतीने धानाची लागवड
By admin | Published: June 17, 2016 2:14 AM