कपिल केकत लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गंभीर रूग्णांसाठी जीवदायी ठरत असलेल्या प्लाझ्माचे युनिट गोंदियात सुरू झाले आहे. यात आतापर्यंत १० बॅगमधील ५ बॅगचे गंभीर रूग्णांना वितरणही करण्यात आले आहे. यावरून जिल्हयात प्लाझ्माची गरज असल्याचे स्पष्ट दिसत आहे. असे असतानाच मात्र येथील प्लाझ्मा युनिटला डोनर मिळणे कठीण झाले आहे. यामुळे प्लाझ्मा युनिट तर आले मात्र डोनर मिळेना अशी येथील स्थिती असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १३ हजार पार झाली असून मृतांचा आकडा १७४ पर्यंत आला आहे. दररोज बाधितांची आखडेवारी वाढत चालली असून रूग्ण बरे होण्याचे जिल्ह्याचे प्रमाणही चांगले आहे यात शंका नाही. मात्र सोबतच वाढत चाललेली मृतांची आकडेवारी हा सुद्धा तेवढाच गंभीर विषय आहे. मध्यंतरी झालेल्या कोरोना स्फोटा दरम्यान राज्याचे आरोग्य मंत्री गोंदियात आले असता त्यांना जिल्ह्यात प्लाझ्मा युनिट देण्याची मागणी करण्यात आली होती. आरोग्य विभागाने त्याचा सातत्याने पाठपुरावा केला व अखेर जिल्ह्याला प्लाझ्मा युनिट मंजूर करण्यात आले. ७ डिसेंबर रोजी येथील प्लाझ्मा युनिटचा शुभारंभ करण्यात आला व तेव्हापासून आतापर्यंत ५ कोरोना योद्धांनी प्लाझ्मा डोनेट केले आहे. एका डोनरकडून २ बॅग प्लाझ्मा काढता येतो. त्यानुसार, येथील प्लाझ्मा युनिटमध्ये प्लाझ्माच्या १० बॅग जमा झाल्या होत्या. विशेष म्हणजे, या १० बॅग मधील ५ बॅग आतापर्यंत वितरीत करण्यात आल्या आहेत. यावरून जिल्ह्यातील गंभीर रूग्णांना प्लाझ्माची गरज भासत असल्याचेही स्पष्ट दिसून येत आहे. तर आजघडीला येथील रक्त केंद्रातील प्लाझ्मा युनिटमध्ये फक्त ५ बॅग शिल्लक आहेत. त्यातही काही रक्त गटाच्या प्लाझ्मा बॅग्स नाहीत. अशात मात्र गंभीर रूग्णांना प्लाझ्माची गरज भासल्यास त्यांना रक्त केंद्रातून प्लाझ्मा बॅग देता येणार नाही. म्हणजेच, ज्या उद्देशातून जिल्ह्यात प्लाझ्मा युनिट सुरू करण्यात आले त्याची पूर्तता होणार नाही व रूग्णाला नाहक जीवाला मुकावे लागण्याची पाळी येणार.
प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी पुढाकाराची गरज जिल्ह्यातील मृतांची संख्या १७४ पर्यंत गेली आहे. विशेष म्हणजे, ७ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील प्लाझ्मा युनिटचा शुभारंभ झाला. म्हणजेच, प्लाझ्मा युनिट या पूर्वीच सुरू झाले असते तर नक्कीच मृतांची ही संख्या कमी असती असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मात्र आता प्लाझ्मा युनिट सुरू झाले असून त्यात प्लाझ्माचा साठा नसल्यानेही हे प्लाझ्मा युनिट सुरू होऊन त्याचा काहीच उपयोग होणार नाही. अशात आता कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांनी स्वत: जीवदानाच्या महाकार्यात आपला हातभार म्हणून प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे व रक्त केंद्र प्रमुख डॉ. संजय चव्हाण यांनी कळविले आहे.
५ पैकी ३ आरोग्य कर्मचारी जिल्ह्यात आतापर्यंत ज्या ५ कोरोना योद्धांनी पुढाकार घेत प्लाझ्मा डोनेट केले आहे. त्यात ३ आरोग्य कर्मचारी असून १ डॉक्टर व २ रक्त केंद्रातील तंत्रज्ञ आहेत. तर २ डोनर्स सामान्य व्यक्ती आहेत. यावरून प्लाझ्मा डोनेट करण्यासाठीही कोरोना रूग्णांसाठी झटत असलेले कोरोनो योद्धाच पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे. मात्र ही बाब योग्य नसून गंभीर रूग्णांचा जीव वाचविण्यासाठी आता सामान्य नागरिकांनीही पुढे येण्याची गरज दिसून येत आहे. कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तीने प्लाझ्मा टोनेट केले तर त्यांच्या हातून जीवदानाचे कार्य घडणार ही बाब महत्वाची आहे.