लोहारा : शासनाने मोठा गाजावाजा करून प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. तसेच शासनाकडून व मागे देवरी तालुका प्रशासनाकडून याविषयी जनजागृती करण्यात आली आहे. मात्र अद्यापही कोणत्याही व्यापाऱ्यांवर स्थानिक नगरपंचायत व तालुका प्रशासनाच्या संबंधित विभागाने कारवाई केली नाही. परिणामी तालुक्यात प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरू आहे.
तालुका प्रशासन व नगरपंचायने ३-४ दिवस प्लॅस्टिक पिशवी आणि थर्माकोलमुक्त महाराष्ट्र जनजागृती अभियान २०१८ अंतर्गत मागील वर्षी तालुक्यातील अनेक व्यापाऱ्यांवर कारवाई केली. परंतु प्लॅस्टिकबंदीला ४ वर्षे लोटूनही देवरी शहरासह तालुक्यात प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरू आहे. यामध्ये शहरातील प्रमुख चौकात, बसस्थानकावर, भाजी-किराणा मार्केट, चिचगड रोड वरील मुख्य बाजार, हॉटेल्स व व्यापारी प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर करीत आहेत. मागील अनेक महिन्यपासून अद्याप एकाही व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली नाही. प्लॅस्टिकबंदी कार्यवाही फक्त कागदावरच असल्याने तालुक्यात खुलेआम प्लॅस्टिक वापर सुरू आहे. शिवाय, व्यापाऱ्यांना प्लॅस्टिकबंदीविषयी कोणतीच भीती राहिली नाही.
------------------------------
लाखो रुपयांचे प्लॅस्टिक पडून
शहर व तालुक्यातील व्यापाऱ्यांकडे प्लॅस्टिक पिशव्या व जूट बॅग वर्षभर पुरेल एवढ्या प्रमाणात पडून असल्याची चर्चा तालुक्यात आहे. प्लॅस्टिक बंदीमुळे प्रत्येक व्यापाऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानामुळे व्यापाऱ्यांची डोकेदुखी झालीच पण ग्राहकांसोबत होणारा वाद वाढत चालला आहे. प्लॅस्टिकबंदी जर कडक झाली तर ग्राहकांसोबत वाद होणार नाही. पण नगरपंचायत व संबंधित विभागाकडून आवश्यक ती कारवाई केली जात नाही.