लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्लास्टिकबंदी अधिसूचना २०१८ ची अंमलबजावणी करून १ मेपासून आपले शहर सिंगल यूज प्लास्टिक मुक्त करावयाचे आहे. यासाठी पर्यावरण विभागाकडून नगर परिषदेला काही सूचना देण्यात आल्या असून त्यानुसार नगर परिषदेने कारवाई करावयाची आहे. मात्र गोंदिया नगर परिषदेकडून सूचनांवर पाहिजे त्या प्रकारे कारवाई होत नसल्याचे दिसून येत असून त्यांना प्लास्टिकबंदीचे काम कठीण जात असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.राज्यात प्लास्टिकबंदी लागू असतानाही सिंगल यूज प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरूच आहे. प्लास्टिकचा वापर पर्यावरणाला घातक असून आता त्याचे परिणामही जाणवत असल्याने पर्यावरण मंत्र्यांनी अन्य मंत्री व विभागातील अधिकाऱ्यांना घेऊन बैठक घेतली होती. या बैठकीत १ मे पासून राज्यात सिंगल यूज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच याबाबत राज्यातील सर्वच जिल्ह्यांना यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. यात जिल्हाधिकारी कार्यालय, महानगर पालिका, नगर पालिका व पर्यावरण विभागांचा समावेश आहे. यानुसार, गोंदिया नगर परिषदेलाही या सूचनांचे पालन करून १ मेपासून शहर सिंगल यूज प्लास्टीक मुक्त करावयाचे असून तशी स्वयं घोषणा करावयाची आहे.मात्र नगर परिषदेकडून पाहिजे त्या प्रमाणात या सूचनांचे पालन केले जात नसल्याचे दिसत आहे. परिणामी सिंगल यूज प्लास्टिकचा शहरात सर्रास वापर सुरू असल्याचे दिसत आहे. तारीखनिहाय देण्यात आलेल्या सूचनांतर्गत नगर परिषदेला १ मार्चपासून शहराच्या अवतीभवती रस्त्यालगत, नदी-नाल्यात टाकण्यात आलेले प्लास्टीक गोळा करून त्याची विल्हेवाट लावायची आहे. तसेच भविष्यात रस्त्यालगत प्लास्टिक टाकले जाणार नाही यासाठी उपाययोजना करायची आहे. शासकीय-निमशासकीय कार्यालय व शाळा-महाविद्यालयांनी त्यांचा परिसर सिंगल यूज प्लास्टिकमुक्त करायचा असून अशा संस्थांना नगर परिषद मार्फत प्रमाणपत्र व बक्षीस द्यायचे आहे. तसेच परराज्यातून येणाऱ्या प्लास्टिकला रोखण्यासाठी पोलिसांच्या मदतीने तपासणी केंद्र तयार करावयाचे आहे. मात्र गोंदिया नगर परिषदेकडून अद्याप याबाबत काहीच करण्यात आल्याचे दिसून येत नाही.शहरात बघावे तेथे कचऱ्याचे ढिगार व त्यात प्लास्टिकचा समावेश दिसून येत आहे. सामान घेताना बाजारात प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच आहे. रस्त्यालगत तसेच नदी-नाल्यांत टाकण्यात आलेले प्लास्टिक गोळा करण्यात आल्याचेही दिसून येत नाही. पर्यावरण विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे नगर परिषदेकडून पालन होत नसल्याचे दिसत आहे.
प्लास्टिकबंदीचे काम कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 5:00 AM
मात्र नगर परिषदेकडून पाहिजे त्या प्रमाणात या सूचनांचे पालन केले जात नसल्याचे दिसत आहे. परिणामी सिंगल यूज प्लास्टिकचा शहरात सर्रास वापर सुरू असल्याचे दिसत आहे. तारीखनिहाय देण्यात आलेल्या सूचनांतर्गत नगर परिषदेला १ मार्चपासून शहराच्या अवतीभवती रस्त्यालगत, नदी-नाल्यात टाकण्यात आलेले प्लास्टीक गोळा करून त्याची विल्हेवाट लावायची आहे.
ठळक मुद्देसूचनांवर कारवाई नाहीच : सिंगल यूज प्लास्टिकचा सर्रास वापर